मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, मनोज जरांगेंचा काळकुटे कुटुंबियांना शब्द
Beed News: भेट घेतली, धीर दिला अन् बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा शब्दच दिला, काळकुटे कुटुंबासाठी मनोज जरांगेंच्या सरकारकडे मोठ्या मागण्या.
Maharashtra News : बीड : बीडमधील (Beed) जगन्नाथ काळकुटे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या केल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मध्यरात्री त्यांच्या कुटुंबीयांची जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी जगन्नाथ काळकुटे यांच्या कुटुंबीयांना उघड्यावर पडू देणार नाही, असा शब्द मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. तर काळकुटे यांच्या कुटुंबीयांना सरकारनं तात्काळ 50 लाख रुपयांची मदत करून एका व्यक्तीला सरकारी नोकरीत घेण्याची मागणी, मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. काळकुटे यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, त्यामुळे सरकारनं तात्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असं देखील मनोज जंरांगे म्हणाले आहेत.
जगन्नाथ काळकुटे यांनी दोन दिवसांपूर्वीच बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या एका झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना समज देऊन घरी पाठवलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या पाश्चात पत्नी, आई आणि दोन मुलं असा परिवार आहे. बीडमधील जगन्नाथ काळकुटे यांचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यामुळे जगन्नाथ काळकुटे यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा शब्द जरांगे पाटलांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये मांजरसुंबा या ठिकाणी सभा सुरू असतानाच जगन्नाथ काळकुटे यांनी बीड शहरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर मध्यरात्री मनोज जरांगे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच, आता याचा जाब सरकारला विचारणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले आहेत. काळकुटे यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत आणि एका व्यक्तीला सरकारी नोकरीत घ्यावं, अशी देखील मागणी जारांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. यासोबतच जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे. आत्महत्या करुन न्याय मिळणार नाही, उलट आपल्या समाजाचंच नुकसान होईल, असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलं
मराठा आरक्षणासाठी बीडमधील तरुणाने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं असल्याची धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. शुक्रवार (20 ऑक्टोबर) रोजी या तरुणाने झाडावर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी देखील त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला. जगन्नाथ पांडुरंग काळकुटे असं या तरुणाचं नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. जगन्नाथ यांच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दरम्यान मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :