(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकऱ्यांचे बँकखाते गोठवणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा; धनंजय मुंडेंची सभागृहात मागणी
Beed News: बीड जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवण्यात आले आहे.
Dhananjay Munde On Insurance Company: बीड जिल्ह्यातील (Beed District) बारा हजार शेतकऱ्यांचे बँक खाते (Farmers Bank Account) बजाज आलियांज या विमा कंपनीने (Insurance Company) चुकीचा पीक विमा जमा झाल्याचे कारण देत गोठवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला तसेच त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या सिबिलवरही झाला. अशाप्रकारे शेतकऱ्यांचे बँक खाते बँकेला कळवून गोठवणे हे बेकायदेशीर असून संबंधित कंपनीवर शासनाने गुन्हे दाखल करुन दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली आहे.
खरीप हंगाम 2022 (Kharip Season) मधील विमा धारक शेतकऱ्यांपैकी सुमारे 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 12 कोटी रुपये रक्कम बजाज आलियांज विमा कंपनीने जमा केले होते. मुळात शेतकऱ्यांना पात्र असूनही विमा मिळत नाही. त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले तर एवढा मोठा व्यवहार करणारी विमा कंपनी जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून पैसे आल्याचे सांगते हे अत्यंत अव्यवहारी आहे असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या सिबिलवरही परिणाम
ऐन अडचणीच्या काळात बँक खाते गोठवल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या खात्यावरील जमा पैसे उचलता येत नव्हते. त्या काळात विमा जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता ते 12 हजार शेतकरी नेमके कोणते, याबाबतही संभ्रम असल्याने अनेक शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला. तसेच विमा कंपनीच्या चुकीच्या वसुली धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सिबिलवरही परिणाम झाला आणि त्याचा त्रास भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज घेताना होऊ शकतो, असे धनंजय मुंडे म्हणाले.
विमा कंपनीविरोधात गुन्हे दाखल करावेत
त्यामुळे विमा कंपनीच्या या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध राज्य शासनाने विमा कंपनीविरोधात गुन्हे दाखल करावेत. तसेच संबंधित शेतकऱ्यांच्या सिबिलवर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश विमा कंपनीला द्यावेत. विमा कंपनीने केलेल्या चुकीमुळे शेतकऱ्यांना जो त्रास झाला, त्याबाबत विमा कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी केली. यावर राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची नोंद घेतली असून योग्य ती कारवाई तातडीने केली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Chhatrapati Sambhajinagar: महावितरण हाय हाय...; उद्योजकांचा आंदोलन, वीजदरवाढ प्रस्तावाची केली होळी