(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhajinagar: महावितरण हाय हाय...; उद्योजकांचा आंदोलन, वीजदरवाढ प्रस्तावाची केली होळी
Chhatrapati Sambhajinagar News: महावितरण हाय हाय, अशा घोषणाबाजी उद्योजकांकडून करण्यात आली.
Chhatrapati Sambhajinagar News: आधीच राज्यातील उद्योग (Industry) बाहेर राज्यात जाता असताना, महावितरण कंपनीने (Mahavitaran Company) वीज नियमक आयोगाकडे सरासरी 37% दरवाढ प्रस्ताव सादर केल्याने उद्योजकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान या निर्णयाला छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) उद्योजकांनी विरोध दर्शवला आहे. शहरातील वाळूज औद्योगिक परिसरातील उद्योजकांनी वीजदरवाढ प्रस्तावाला विरोध करत, होळी केली आहे. यावेळी महावितरण हाय हाय, अशा घोषणाबाजी उद्योजकांकडून करण्यात आली.
दरम्यान मसिआ ऊर्जा मंच, सिएमआयए, लघु उद्योग भारती व टीम ऑफ असोसिएशनच्या सर्व संघटनेतर्फे महावितरण कंपनीला निवदेन देण्यात आला आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, वीज ग्राहक व औद्योगिक संघटना राज्य स्तरीय समिती (ECIOCC) यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे महावितरण कंपनीने 67,644 कोटी रुपये तुटीच्या भरपाईसाठी सरासरी 37% म्हणजे सरासरी 2.55 रु. प्रति युनिट याप्रमाणे प्रचंड अतिरेकी दरवाढ मागणीचा प्रस्ताव दाखल केला आहे. ही दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यात यावी या मागणीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतून विविध औद्योगिक, शेतकरी व ग्राहक संघटना आणि वीज ग्राहक यांच्याकडून आयोगाकडे 15 फेब्रुवारीपर्यंत हजारोंच्या संख्येने सूचना व हरकती दाखल करण्यात आल्या. दरम्यान बुधवारी याच वीजदरवाढ प्रस्तावाचे होळी आंदोलन करण्यात आले.
वीजदरवाढ उद्योजकाला कदापि परवडणारी नाही
यावेळी मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यांनी म्हटले आहे की, आम्ही संघटनेच्या सर्व उद्योजक सदस्यांना या वीजदरवाढीच्या विरोधात संबंधित कार्यालयाला आयोगाच्या वेबसाईटवर ई-पब्लिक कन्सल्टेशन लिंकवर नोंद करुन पीडीएफ अपलोड करुन हरकती नोंदवलेल्या असून, प्रस्तावित केलेली अवाजवी वीजदरवाढ उद्योजकाला कदापि परवडणारी नाही. महावितरणने योग्य नियोजन केल्यास प्रस्तावित वीजदरवाढ करायची गरज भासणार नाही. उलट वीज दर वाढ कमी करता येईल. आज मसिआ संघटना 'वीज दरवाढ प्रस्ताव होळी आंदोलन' करुन या वीज दरवाढीचा निषेध करत असून, या संदर्भात पुढे देखील संघटनेच्या सोबत असेल असे किरण जगताप यांनी म्हटले आहे.
जोरदार घोषणाबाजी!
कोरोना परिस्थितीमुळे दोन वर्षे उद्योग क्षेत्राला मोठ्याप्रमाणावर नुकसान सहन करावे लागले होते. त्यात अनेक उद्योग इतर राज्यात शिफ्ट होत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत महावितरणकडून सरासरी 37% दरवाढ होणारा निर्णय घेण्यात येऊ नयेत अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. तर याविरोधात छत्रपती संभाजीनगरच्या सर्व उद्योजकांनी एकत्रित येऊन आंदोलन केले आहे. यावेळी वीज दरवाढ करु नका, वीज दरवाढीचा प्रस्ताव रद्द करा, महावितरण हाय हाय, अशी घोषणाबाजी उद्योजकांनी दिल्या.
इतर महत्वाच्या बातम्या:
G-20 परिषदेसाठी आलेल्या महिला प्रतिनिधीनी घेतला छत्रपती संभाजीनगरचा निरोप