धक्कादायक! घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने उपोषणाला बसलेल्या व्यक्तीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच दुर्दैवी मृत्यू
Beed News: थंडीत कुडकुडत उपोषणाला बसलेले आप्पाराव पवार यांचा मृत्यू झाला आहे.
Beed News: लालफितशाहीचा कारभार आणि प्रशासन किती गेंड्याच्या कातडीच असतं याचा नमुना बीडमध्ये पाहायला मिळाला आहे. हक्काचं घरकुल बांधून मिळावे तसेच, उरलेले हप्ते मिळावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या एका उपोषणार्थीकडे लक्ष द्यायला जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच थंडीने कुडकुडत या उपोषणार्थी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून, कारवाईची मागणी होत आहे.आप्पाराव भुजाराव पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आप्पाराव पवार हे वासनावाडी येथील रहिवासी आहे. पवार हे गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. शासनाने मंजूर केलेले घरकुल तातडीने बांधून देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी पवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषण करत होते. मात्र त्यांच्या उपोषणाची साधी दखलही घ्यायला जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्यासह प्रशासनाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे थंडीत कुडकुडत उपोषणाला बसलेले आप्पाराव पवार यांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूनंतरही प्रशासनाला पाझर फुटलं नाही...
दोन दिवसांपासून थंडीत कुडकुडत उपोषणा बसलेल्या पवार यांच्या मागणीकडे वेळ देण्यासाठी प्रशासनाला वेळ मिळाला नाही. अखेर त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या दारात आपला जीव सोडला. पण त्यांच्या मृत्यूनंतरही प्रशासनाला पाझर फुटलं नाही. पवार यांचा मृतदेह दोन ते तीन तास उपोषण स्थळीच होता. ना तिथे पोलीस आले, ना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर किंवा जिल्हा प्रशासनातील अधिकारी आले. तब्बल तीन तासांनी त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यामुळे प्रशासन किती कठोर काळजाचा असू शकतो याचा हा उदाहरण म्हणावे लागेल.
पवारांच्या मृत्यूला जिल्हा प्रशासन जबाबदार...
घरकुल योजनेचे थकलेले हप्ते मिळत नसल्याने पवार यांनी अनेक कार्यालयाच्या खेट्या मारल्या. अधिकाऱ्यांकडे विनवणी केली, पण त्यांच्या मागणीकडे कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले होते. पण त्यानंतर देखील त्यांच्या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले. आणि अखेर थंडीने कुडकुडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी केलाय. तर पवारांच्या मृत्यूला जिल्हा प्रशासनचं जबाबदार असल्याचा आरोप देखील त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
Beed Gram Panchayat Election : ॲम्बुलन्समधून येऊन बाळंतिणीने सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला