(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pankaja Munde : कधी कधी वाटतं सगळं सोडून द्यावं, पण... : पंकजा मुंडे
Beed News Update : "मी उजवीकडे गेले तर जमेल का? की मी डावीकडे गेल्यास जमेल? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी आज कार्यकर्त्यांना आणि जनतेला विचारला. यावर कार्यकर्त्यांनी त्यांना कोठेही न जाण्याचा सल्ला दिला.
बीड : "दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांचाही एकदा पराभव झाला होता. मात्र माझ्या पराभवाची चर्चा जास्त झाली. पराभव जरी झाला असला तरी मला मतदान करणाऱ्या लोकांना मी वाऱ्यावर सोडू शकत नाही. कधी कधी वाटतं सगळं सोडून द्यावं, मात्र तुमचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर येतात आणि माझं संपूर्ण आयुष्य मी आता तुमच्या चरणी अर्पण केलेल आहे, असं मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केलंय. आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत पंकजा मुंडे यांनी परळी शहरात भव्य रॅली काढली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. त्यामुळे त्या कोणता निर्णय घेणार का? असे देखील बोलले जात आहे. या चर्चांवरून पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना एक प्रश्न विचारला. "मी उजवीकडे गेले तर जमेल का? की मी डावीकडे गेल्यास जमेल? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि जनतेला विचारला. यावेळी जमलेल्या नागरिकांनी पंकजा मुंडे यांना कुठेही न जाण्याचा सल्ला दिला. याबरोबरच आम्ही आपल्या सोबत आहोत, असे म्हणत पंकजा मुंडे यांना यावेळी कार्यकर्त्यांना धीर दिला.
पंकजा मुंडे यांनी यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. माझा संघर्ष कायम आहे, सध्या फोटोचे राजकारण सुरू असल्याचे सांगत धनंजय मुंडे यांना टोला लगावला.
परळीत झालेली एक चूक महागात पडली
पंकजा मुंडे म्हणाल्या, परळीत माझ्याकडून जी चूक झाली ती आपल्याला खूप महागात पडली आहे. माझ्यावर आरोप करताना शत्रूंनी पातळी सोडली, मात्र मी कधी पातळी सोडली नाही, मी सदैव तुमच्यासोबत आहे, तुमचे काम करत राहीन. लोकांच्या घरापर्यंत जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच यापुढे तिकीट देणार. पंकजाताई परळीत कुठे दिसत नाहीत असं म्हणणाऱ्यांनी अतिवृष्टीच्या काळात मी जी मदत केली आणि कोरोनाच्या काळात जे काम केलं ते एकदा पहावं. त्यामुळे आता आपल्याला लोकांमध्ये उतरून काम करावे लागणार आहे. लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचावं लागणार आहे. त्यासाठी ज्यांना कोणाला माझ्यासोबत यायचं असेल त्यांनी यावं, येत्या काळात परळीत होणाऱ्या निवडणुकीत अशाच कार्यकर्त्यांना मी तिकीट देणार आहे की जे लोकांच्या घरापर्यंत जातील.
गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला स्वाभिमानाने जगण्याची संस्कृती दिली आहे. कोणाचीही चाकरी करू नका असं मुंडे साहेबांनी आपल्याला शिकवलं आहे, असे सांगत प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्यासह अन्य नेत्यांच्याही आठवणीला यावेळी पंकचा मुंडे यांनी उजाळा दिला.