आईच्या डोळ्यांदेखत लेकरू पुरात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह समोर; बीडचं कुटुंब उध्वस्त, घरात चूलही पेटली नाही
अनेक भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेती साहित्य वाहून गेल्याच समोर आलं.

Beed: दुष्काळी बीड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला. या पावसाने शेतीचं नुकसान केलंच मात्र काहीजणांना आपल्या जवळच्यांना गमवावं लागलं. बीड तालुक्यातील पिंपळवाडी गावात बिंदुसरा नदीला पूर आला आणि याच पुरात दहा वर्षाच्या आदित्य उत्तम कळसाने या मुलाला आपला जीव गमवावा लागला.. आईच्या डोळ्यादेखत जन्म दिलेलं मूल वाहत होतं. मात्र काहीच करू न शकलेली आई आता हतबल झाली आहे. तिच्याकडे बोलण्यासाठी शब्द देखील उरले नाही..
अतिवृष्टीमुळे राज्यातील (Maharashtra Rain) अनेक जिल्हे मोठ्याप्रमाणावर बाधीत झालेले आहेत. शेतकरी अक्षरश: कोलमडून पडलाय. राज्यातील मंत्र्यांचेही (Maharashtra Goverment) दौरे सुरू झाले आहेत. बीड जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नदीकाठच्या परिसरातील पुराचे ओसरले आहे. अनेक भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेती साहित्य वाहून गेल्याच समोर आलं.
पावसामुळे बिंदुसरा नदीला पूर
रविवारी दुपारच्या सुमारास गावात मुसळधार पाऊस सुरू झाला. आधीच ओसंडून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला अचानक मोठा पूर आला. नदीच्या काठावरील पिकांसह शेतातील जनावरांनाही या पुराचा फटका बसला. याच गोंधळात चौथीत शिकणारा आदित्य आईसोबत शेतात गेला होता. पावसाचा जोर वाढल्याने गावकऱ्यांनी शेतात अडकलेल्या जनावरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचवेळी पुराच्या लाटांमध्ये हा दहा वर्षांचा चिमुकला वाहून गेला.
"रानात कणसं कापायला गेलो होतो. लई पूर आला . आमच्या हातातून निसटलं पोर . आम्ही आरडाओरडा केला . पण आजूबाजूला गडी माणसंही नव्हती . नंतर शोधाशोध झाली . तो कुठेही सापडत नव्हता . पावसाच्या नंतर सापडला . पाणी खूप असल्यामुळं काहीच करता आलं नाही . आमच्या जवळच होता . हातातून निसटून पूराच्या पाण्यात पडला . बाजरीची कणसं काटायला रानात गेलो होतो . त्याला सुट्टी असल्यामुळे रानात येण्यासाठी हट्ट करत होता . तासभर शोधल्यानंतर सापडला ." आदित्यच्या अचानक जाण्यानं माऊलीच्या डोळ्यात अश्रू आवरत नव्हते .
"रानात जाताना नदीला पाणी आलं. सगळ हातातून गेलं .रविवार होता. शाळांना सुट्टी होती. त्यामुळे शेतात घेऊन गेले होते. आमच्या गावात पाऊस होता. " हे बोलताना आदित्यच्या आजीचा अश्रूंचा बांध फुटला होता.
मूल गेलं, कुटुंब उध्वस्त, घरात चूलही पेटली नाही
आदित्य कळसाने गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होता. रविवारचा दिवस असल्याने आईसोबत तो शेतात निघाला.. मात्र याचवेळी गावात अति मुसळधार पाऊस झाला आणि गावातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आला. याच पुराच्या पाण्यात आदित्य वाहून गेला. गावातील ग्रामस्थांनी त्याचा तासभर पाण्यात शोध घेतला त्यानंतर त्याचा अखेर मृतदेहच बाहेर काढण्यात आला.. आज कळसाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बीडमध्ये झालेल्या पावसात त्यांना आपल्या मुलाला गमवावे लागले. आदित्य गेल्यापासून या घरात चूल देखील पेटली नाही. आदित्यची आई निशब्द आहे. तर खांद्यावर खेळवलेल्या नातवाला गमवावं लागल्याने आदित्यची आजीला अश्रू अनावर होत आहेत..
बीड जिल्हा दुष्काळासाठी नेहमीच ओळखला जातो. मात्र या वेळेस पावसाने जास्तीचा कहर केला आहे. एका बाजूला शेतातील पिकांचं नुकसान झालं, तर दुसऱ्या बाजूला एका चिमुकल्याचं आयुष्य हिरावून घेतलं. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे या घटनेची दखल घेऊन कुटुंबाला तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे.






















