Sanjay Raut : एकमेकांवर जहरी टीका करणारे दोन 'संजय' एकमेकांसमोर; संजय राऊत - संजय शिरसाठ भेटले आणि हस्तांदोलन केलं, राजकीय चर्चा जोरात
Sanjay Raut Meet Sanjay Shirsath : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ एकमेकांसमोर आले.
मुंबई: शिवसेनेत फुट पडल्यापासून एकमेकांवर जहरी टीका केली नाही असा एकही दिवस गेला नाही... तेच एकमेकांचे कट्टर विरोधक ठाकरे गटाचे संजय राऊत आणि शिंदे गटाचे संजय शिरसाठ आज एकमेकांच्या समोर (Sanjay Raut Meet Sanjay Shirsath) आले. संजय राऊत आणि संजय शिरसाठ यांनी हस्तांदोलनही केलं. या दोघांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चा रंगली आहे.
शिवसेना फुटीनंतर खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर चांगलीच टीका केली होती. त्याला प्रत्युत्तरही तेवढ्याच ताकतीने दिलं जायचं. शिंदे गटाकडून खासकरून संजय राऊत यांच्यावर टीका केली जायची. त्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातले आमदार संजय शिरसाठ हे नेहमी अग्रक्रमावर असायचे. कधी कधी दोन्ही बाजूंकडून पातळी ओलांडून वैयक्तिक टीकाही केली जायची.
Sanjay Raut Meet Sanjay Shirsath : समोर आले आणि विचारपूसही केली
आज संजय राऊत हे संभाजीनगरमधील एका हॉटेलसमोर आले असताना त्याच वेळी शिंदे गटाचे संजय शिरसाठ त्या ठिकाणी आले. दोघेही एकमेकांमोर आल्यानंतर एकमेकांना नमस्कार केला, हस्तांदोलन केलं आणि एकमेकांची विचारपूसही केली.
दोन राजकारणातले हे 'संजय' एकमेकांसमोर आल्यानंतर मात्र महाराष्ट्रातील राजकीय परंपरा पाळत एकमेकांची विचारपूस केली. या दोघांची ही भेट काहीच क्षणापुरती होती, मात्र या भेटीची चर्चा मात्र आता चांगलीच रंगल्याचं दिसून येतंय.