Exclusive : मराठवाड्यासाठी मोठी बातमी! औरंगाबादमध्ये लवकरच 'एक्स बॅंन्ड डॉप्लर रडार' बसवणार
Marathwada Doppler Radar Exclusive : मराठवाड्यासाठी मोठी बातमी! मागील काही वर्षांपासून वातावरणीय बदलाचा फटका बसत आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये लवकरच 'एक्स बॅंन्ड डॉप्लर रडार' बसवणार आहेत.
Marathwada Doppler Radar : मराठवाड्याला मागील काही वर्षांपासून वातावरणीय बदलाचा फटका बसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मराठावड्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. औरंगाबादमध्ये लवकरच एक्स बॅंन्ड डॉप्लर रडार बसवण्यात येणार आहे. भू-विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय हवामान विभागाकडून डॉप्लर रडार बसवले जाणार आहे. याचा फायदा पश्चिम विदर्भाला देखील होणार आहे. भारतीय हवामान विभागाकडून औरंगाबादमधील जागांची चाचपणी सुरु आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी खासदार सुधाकर श्रृंगारे यांना पत्र लिहित ही माहिती दिली आहे. खासदार श्रृंगारेंकडून लोकसभेत पाठपुरावा केल्यानंतर मराठवाड्यासाठी रडार देण्याची घोषणा सिंह यांनी केली आहे. हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे आणि अनेक शास्त्रज्ञांकडून मराठवाड्यात मागील काही वर्षांपासून होत असलेल्या हवामान बदलामुळे रडार बसवण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. हे रडार औरंगाबादपासून 100 किमीपर्यंत व्यासाच्या परिसरातील वातवरणातील इंतभूत माहिती देणारं आहे. मुंबईत देखील चार एक्स बॅंड डॉप्लर रडार बसवलं जाणार आहे. आयआयटीएम संस्थेकडून मुंबईतील वातावरणातील बदल, पाऊस आणि इतर अभ्यासाकरता रडार बसवण्यात येणार आहे.
मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी, ढगफुटी, गारपीट आणि पावसाअभावी शेतीचे मराठवाड्यात अतोनात नुकसान होत आहे. रडारच्या माध्यमातून मुसळधार पाऊस कुठे, किती आणि कसा पडत आहे? ढगांची दिशा, त्याचसोबत ढगांमध्ये पाणी आहे की, बाष्प याचा अंदाज अचूक वर्तवण्यात मदत मिळत असते. डॉपलर रडार (Doppler Radar) पावसाची खात्रीशीर माहिती देणारी आपत्कालीन यंत्रणा आहे. डॉपलर रडार पाऊस, ढगफुटी, गारपिटीची माहिती चार ते सहा तास आधी देते असते. सोबतच साधारण रडारच्या वेगवेगळ्या क्षमतेनुसार, ते आपल्या परिघातील पावसाची तीव्रता कशी असेल आणि किती मीमी पाऊस प्रति तास कोसळू शकेल याचा अंदाज डॉपलर रडारच्या माध्यमातून अचूक मिळत असतो.
एक्स बॅंड रडार काय करणार?
- ढग तयार होण्यासारखी परिस्थिती आहे का याची माहिती देणार
- निर्मिती झालेले ढग गडद होणार की नाही?, की विखरुन जाणार याची माहिती देणार
- सोबतच वाऱ्यांची दिशा आणि वारे किती उंचीवर वाहणार ते देखील कळणार
- हवेतील बाष्प, बर्फाचे कण तसेच पाण्याच्या थेंबाचा आकार किती व कसा असणार याची देखील माहिती मिळणार
- प्रामुख्याने ढगफुटी आणि गारपिटीची माहिती अचूक मिळणार
महत्त्वाच्या इतर बातम्या :
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा