Sugarcane Sludge: ऊस कारखान्यात जाण्याची आशा मावळल्याने शेतकरी उसाला लावतोय आग
ऊस तोडीला मजूर मिळत नसल्याने आणि कारखान्यात नंबर लागत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
Sugarcane Sludge: मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अजूनही ऊस शेतात उभा असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाला असून, ऊस कारखान्यात जाण्याची आशा मावळल्याने ऊसाच्या फडात स्वतःच आग लावताना पाहायला मिळत आहे. अशीच काही परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यातील शेंदूरवादा भागात पाहायाला मिळत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच यावर्षी मोठं आर्थिक नुकसान होत आहे.
औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा परिसरात अनेक शेतकऱ्यांनी ऊसाला पसंती दिली होती. काबाड कष्ट करून ऊसाला जगवले सुद्धा, पण शेवट्पर्यंत ऊस तोडणीसाठी नंबर लागत नसल्याचे चित्र आहे. कारखाने ऊस घेत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यात पावसाळा तोंडावर आला असताना आणि ऊस तोडीची आशा मावळल्याने शेतकरी ऊसाचे फड पेटवून देत आहे.
आठ एकर ऊसाला लावली आग...
शेंदूरवादा भागातील तात्याराव मातकर यांची 14 एकर शेती असून, आठ एकरात त्यांनी उसाची लागवड केली होती. चांगले आर्थिक उत्पन्न होईल अशी आशा असल्याने त्यांनी ऊसाला मोठं करण्यासाठी काबाड कष्ट केले. दिवसा लाईट नसल्याने रात्रीच जागून पाणी भरलं. पण आता ऊस तोडीला मजूर मिळत नाही तर दुसरीकडे ऊस घेण्यासाठी कारखाने सुद्धा तयार होत नाही. त्यामुळे फडाला आग लावून जळालेला ऊस जनावरे पाळणाऱ्या लोंकाना कवडीमोल भावाने विक्री करण्याची वेळ मातकर यांच्यावर आली आहे. तर अशीच काही परिस्थिती या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे.
तरुण शेतकऱ्याने पेटवलं ऊस...
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथील शेतकरी शरद दिलीप रक्ताटे यांनी आपला एक एकर ऊस पेटवून दिला आहे. शरद रक्ताटे यांचा ऊस वीस महिन्याचा झाला होता. वारंवार वेगवेगळ्या कारखान्यात जाऊन ऊस तोडणी साठी विनंती करून देखील ऊस तोडणी होत नव्हती. तोड करण्यासाठी खिशात पैसा नाही अशा परिस्थितीत सापडलेल्या शरद रक्ताटे यांनी अखेर आपल्या एक एकर उसाला काडी लावून पेटवून दिला आहे.