धक्कादायक! विरोधात निकाल देताच महिलेला आला तहसील कार्यालयातच हृदय विकाराचा झटका
Aurangabad News: गंभीर अवस्थेत महिलेला तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महसूल विभागाची कोणतीही पूर्वकल्पना नसतांना आणि सुनावणीची नोटीस न देताच शेतातील रस्त्याच्या वादाचा निकाल विरोधात दिल्याने एका 45 वर्षीय महिलेला तहसील कार्यालयातच सौम्य हृदयविकाराचा झटका आला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तहसील कार्यालयात एकचं गोंधळ उडाला. तर महिलेचे नातेवाईक आक्रमक झाल्याने तहसील कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तातडीने घटनास्थळी सोयगाव पोलिसांनी पाचारण करण्यात आले, त्यामुळे तणाव निवळला. त्यानंतर गंभीर अवस्थेत महिलेला तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. चांद्रकालाबाई पांडुरंग शिंदे (वय 45, रा.पळाशी ता.सोयगाव) असे या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चांद्रकालाबाई यांची पळाशी शिवारात गट क्र. 297 मध्ये एक हेक्टर शेती आहे. याच शिवारातून गट क्र. 295 आणि 296 कडे जाण्यायेण्यासाठी काही शेतकऱ्यांनी रस्ता मिळावा अशी मागणी तहसील कार्यालयाकडे केली होती. दरम्यान याप्रकरणी महसूल विभागाकडून 6 शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आली होती. मात्र याचवेळी महसूल विभागाकडून चंद्रकलाबाई शिंदे या महिलेला रस्त्याच्या सुनावणीसाठी कोणतीही नोटीस अथवा पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती.
हातात विषाची बाटली घेऊन गाठलं महसूल कार्यालय...
आपल्या शेतातून रस्त्याची मागणी करण्यात आली असून, त्यावर सुनावणी असल्याची कुणकुण चंद्रकलाबाई यांना लागली. त्यामुळे या महिलेने पळाशीवरून थेट सोयगाव तहसील कार्यालय गाठलं. हातात विषारी कीटकनाशकाची बाटली घेऊन नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे यांच्या दालनात चंद्रकलाबाई पोहचल्या. तसेच माझ्या शेतातून नियमबाह्य रस्ता कोणत्या आधारावर दिला याचा जाब विचारू लागल्या.
नायब तहसीलदाराच्या दालनात हृदय विकाराचा झटका
यावेळी तुमच्या शेतातील बंद केलेला आणि वापरत नसलेला रस्ता दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी चंद्रकलाबाई यांना दिली. हे आयकताच महिलेने हातातील कीटकनाशकाचे सेवन करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही नागरिक व नायब तहसीलदार यांनी त्या महिलेच्या हातातील कीटकनाशकाची बाटली हिसकावून घेतली. यावेळी या महिलेला धास्तीपोटी सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्यामुळे घटनास्थळी तातडीने ग्रामीण रुग्णालयाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेची तपासणी केल्यावर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
तहसील कार्यालयात तणाव
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी इतर लोकांकडून पैसे घेऊन खोटे पंचनामे केल्याचा आरोप महिलेच्या नातवाईकांनी यावेळी केला. तसेच चंद्रकलाबाई यांच्या शेतातून येण्या-जाण्यासाठी रस्ता असल्याचा खोटा अहवाल तहसील विभागाला स्थानिक अधिकाऱ्यांनी दिला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तसेच महिलेच्या इतर नातेवाईकांनी सुद्धा हातात विषाच्या बाटल्या घेऊन आंदोलन केले. त्यामुळे तहसील कार्यालयात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर तणाव निवळला होता.