(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: कमजोरांनाच कुबड्याचा आधार घ्यावा लागतो; शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून जलील यांची टीका
Aurangabad: औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली आहे.
Aurangabad News: राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडमध्ये युती (Shiv Sena Sambhaji Brigade alliance) झाली आहे. याच युतीवरून एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel ) यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. कमजोरांनाच कुबड्याचा आधार घ्यावा लागतो असा खोचक टोला जलील यांनी शिवसेनेला लगावला आहे. औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली आहे.
यावेळी शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीच्या प्रश्नाला उत्तर देतांना जलील म्हणाले की, जे कमजोर असतात, त्यांना लाचारी म्हणून कुबड्याची आवश्यकता असते. या कुबड्याची मला गरज नाही. माझी शक्ती काय आहे हे मला माहित आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षांना आवाहन आहे की, तुमच्यात हिम्मत असेल तर औरंगाबादमध्ये एक-एक या असेही जलील म्हणाले. त्यामुळे त्यांच्या या टीकेला शिवसेना कोणत्या शब्दात उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठीच्या योजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष...
अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 15 कलमी कार्यक्रम अंतर्गत असलेल्या विविध योजना व कार्यक्रमाची घोषणा केली होती. यासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मोदींचे मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले. मात्र अल्पसंख्याकांची मोठी संख्या असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात या योजनेला घरघर लागली असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही योजना रखडली आहे. याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
चार वर्षात एकही बैठक नाही...
कोणतेही योजना सुरु झाल्यावर प्रत्येक तीन-चार महिन्याला त्याबाबत किमान एक आढावा बैठक घेणे बंधनकारक असते. मात्र अल्पसंख्याक कल्याणासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनेबाबत शेवटची बैठक चार वर्षांपूर्वी झाली होती. त्यामुळे गेल्या चार वर्षात अल्पसंख्याक कल्याणासाठी एकही बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे औरंगाबादच्या प्रशासनाने याचे उत्तर द्यावे, अशी मागणी जलील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या...