(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबादमध्ये 90 लाखांचा गुटखा जप्त, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अवैध वाहतूक
पोलिसांंनी जप्त केलेला गुटखा 90 लाख किमतीचा आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात या गुटख्याची दुप्पट-तिप्पट किमतीने विक्री होत आहे. त्यानुसार याची किंमत किमान 5 ते 6 कोटी एवढी आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरामध्ये अत्यावश्यक सेवेचं बॅनर लावून ट्रकमध्ये गुटखा वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून 90 लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. लॉकडाऊनच्या काळातही राज्यात सर्रासपणे गुटख्याची वाहतूक होत असल्याचं यातून समोर आलं आहे.
ट्रकच्या काचेवर अत्यावश्यक सेवेच्या बॅनर लावला असल्याने कोणालाही शंका येणार नाही, की ट्रकमधून गुटख्याची वाहतूक होत असेल. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली त्यावेळी गुटखा वाहतुकीचा प्रकार समोर आला. औरंगाबाद शहरात चोरट्या मार्गाने हा गुटखा येत होता. थेट कर्नाटकातून हा गुटखा औरंगाबादमध्ये येत असल्याचंही चौकशीतून समोर आलंय.
कसा होतो गुटख्याचा प्रवास?
गुटख्याची वाहतूक फक्त रात्रीतून केली जाते. गुटख्याची ऑर्डर मिळाल्यानंतर गुटखा पोहोचवण्याची जबाबदारी मध्यस्थीची असते. कधी हैदराबाद तर कधी कर्नाटकमधून हा गुटखा दोन रात्रीतून औरंगाबाद, जालन्यात येतो. गुटखा शहरात पोहोचल्यावर पहाटेच्या सुमारास त्याची विभागणी करण्यात येते आणि त्याचे छोटे छोटे पाकीट दुचाकीच्या साहाय्याने अनेक वितरकांपर्यंत पोहोचवले जातात. त्यानंतर या वितरकांकडून गुटखा पान टपरीवर पोहोचवला जातो. सध्या टपरी बंद असल्याने गुटख्याची होम डिलिव्हरी सुरु असल्याचंही समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेला गुटखा 90 लाख किमतीचा आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात गुटख्याची दुप्पट-तिप्पट किमतीने विक्री होत आहे. त्यानुसार याची किंमत किमान 5 ते 6 कोटी एवढी आहे.