सिमेंट बाकडे तोडल्यावरुन वाद, औरंगाबादमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या गटात तुंबळ हाणामारी
भाजपच्या पंचायत समिती सदस्याच्या पुढाकारातून लोकमान्य चौकात सिमेंटचे चार बाकडे बसवण्यात आले होते. अज्ञात लोकांनी हे बाकडे रविवारी (24 एप्रिल) रात्री तोडले. त्यावरुन दिवसभर वातावरण तापले होते.
औरंगाबाद : औरंगाबादच्या वाळूज महानगरमध्ये सिमेंट बाकडे तोडल्याच्या कारणावरुन भाजप आणि शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सोमवारी (25 एप्रिल) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. यात दोघे जखमी झाले आहेत. एकाच्या डोक्याला मार लागल्याने त्याला उपचारासाठी घाटीमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल झाली नाही.
वाळूज एमआयडीसीमधील बजाजनगर वडगाव कोल्हाटी इथल्या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये युवा सेना आणि भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. दोघांकडून जंगी तयारी सुरु आहे. होर्डिंग लावणे, परिसरात कार्यक्रम घेणे यावरुन दोन्ही गटांत धुसफूस सुरु आहे. मागील महिन्यात रांजणगाव येथील भाजपच्या पंचायत समिती सदस्याच्या पुढाकारातून लोकमान्य चौकात सिमेंटचे चार बाकडे बसवण्यात आले होते. यासाठी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता.
अज्ञात लोकांनी हे बाकडे रविवारी (24 एप्रिल) रात्री तोडले. ही माहिती संबंधित पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यावरुन दिवसभर वातावरण तापले होते. हे बाकडे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यानेच तोडले असे गृहित धरुन याचा जाब विचारण्यासाठी पाच ते सहा कार्यकर्ते लोकमान्य चौकात गेले. तिथे वादावादी होऊन हाणामारी झाल्याने दोन्ही गटांतील दोघे जखमी झाले. एकाच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला घाटीमध्ये दाखल केलं आहे. या हाणामारी प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल नव्हती.
इतर बातम्या
औरंगाबादेत आजपासून 9 मेपर्यंत जमावबंदी! 1 मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार?