औरंगाबादच्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत राडा, संजय भोर-विनोद पोखरकरांचे समर्थक भिडले
मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर 21 मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. सहज मान्य होणाऱ्या मागण्यासुद्धा मान्य करण्यात आल्या नाहीत. यावर सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घ्यावा अन्यथा मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात भूमिका घेईल, असा इशारा आज औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिला.
औरंगाबाद : औरंगाबादच्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रचंड गोंधळ बघायला मिळाला. समन्वयकांच्या बैठकीत दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. संजय भोर आणि विनोद पोखरकर यांच्यात वादावादी झाल्याचं समोर येत आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर 21 मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाने बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र या बैठकीत मराठा समन्वयकांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषदेसाठी सुरुवात होण्याआधीच दोन गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
उपस्थित असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा गोंधळ काही वेळ सुरुच होता. त्यामुळे बैठकीत चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. अहमदनगरचे संजय भोर आणि मुंबईचे समन्वयक विनोद पोखरकर या कार्यकर्त्यांमध्ये ही वादावादी झाली.
मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर 21 मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. सहज मान्य होणाऱ्या मागण्यासुद्धा मान्य करण्यात आल्या नाहीत. यावर सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घ्यावा अन्यथा मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात भूमिका घेईल, असा इशारा आज औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिला.
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाने राज्यात 58 मूक मोर्चे काढले. या आंदोलनानंतर शासनाने मराठा समाजाला एसईबीसी या नव्या प्रवर्गानुसार 16 टक्के आरक्षण दिले. मात्र या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.
राज्यात सुरु असलेल्या नोकर भरतीत खुल्या प्रवर्गातील पदे न भरण्याचा आणि मराठा समाजाला देऊ केलेल्या आरक्षणानुसार पदभरती न करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची महत्त्वपूर्ण बैठक आज औरंगाबादेत पार पडली.