(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तान कोर्टाकडून 10 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
यावर्षी हाफिज सईदल फेब्रुवारीमध्ये दहशतवादविरोधी कोर्टाने 11 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. सध्या तो लाहोरच्या उच्च सुरक्षा कोट लखपत कारागृहात बंद आहे.
मुंबई : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याला जोरदार दणका दिला आहे. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने बेकायदेशीर निधी प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा त्याला ठोठावली आहे. सईदला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे आणि अमेरिकेने त्याच्यावर 10 कोटी डॉलर्सचे बक्षिसही ठेवले आहे.
गेल्या वर्षी 17 जुलैला दहशतवादी फंडिंग प्रकरणात हाफिज सईदला अटक करण्यात आली होती. यावर्षी फेब्रुवारीमध्ये दहशतवादविरोधी कोर्टाने त्याला 11 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. सध्या तो लाहोरच्या उच्च सुरक्षा कोट लखपत कारागृहात बंद आहे.
लाहोर कोर्टातील एका अधिकाऱ्याने म्हटलं की, लाहोरच्या दहशतवादविरोधी कोर्टाने (एटीसी) गुरुवारी जमात-उद-दावा संघटनेचा प्रमुख हाफिज सईदसह चार जणांना शिक्षा सुनावली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी कोर्टाने जमात-उद-दावाच्या प्रवक्त्याला टेरर फंडिंगच्या दोन प्रकरणात 32 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. टेरर फंडिंगच्या प्रकरणात कोर्टाने सईदच्या नातेवाईकासह जमात-उद-दावाच्या इतर दोन नेत्यांनाही दोषी ठरवले.
दहशतवादविरोधी कोर्टाचे न्यायाधीश एजाज अहमद बट्टर यांनी जमात-उद-दावाचे प्रवक्ते याह्या मुजाहिदला दोन प्रकरणात 32 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे, असे एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले. त्याचबरोबर प्रोफेसर जफर इक्बाल आणि प्रोफेसर हाफिज अब्दुल रहमान मक्कीला (सईदचा नातेवाईक) दोन प्रकरणात अनुक्रमे 16 आणि एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.