(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Graduate Constituency Election : आता बेरीज वजाबाकीच्या राजकारणास सुरुवात ; मविआ आणि भाजपमध्ये मुकाबला...
अमरावतीमध्ये प्रहारच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. पण इतर चार जागांबाबत काय, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. एकूण 34 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. आता रिंगणात 23 उमेदवार शिल्लक आहेत.
Graduate Constituency Election Amravati : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपण पाचही जागा मेस्टा संघटनेसोबत लढणार असल्याचे सांगून प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी निवडणुकीत रंगत भरली होती. पण आज, सोमवारी अमरावतीमधील त्यांच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. त्यामुळे आता मविआ आणि भाजपमध्ये थेट मुकाबला होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
प्रहार-मेस्टा व जुनी पेन्शन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, अशा दोन उमेदवारांसह दहा जणांनी माघार घेतली. यामुळे रिंगणात आता 23 उमेदवार राहिले आहेत. निवडणुकीचे रिंगण स्पष्ट झाले असून यामध्ये महाविकास आघाडी व भाजपसह वंचित बहुजन आघाडी व बहुजन भारत पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. असे असले तरी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अशी लढत होईल, असे सध्यातरी दिसत आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दहा उमेदवारांनी माघार घेत असल्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले.
23 उमेदावर रिंगणात
एकूण 34 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. एका उमेदवाराचे वय कमी पडल्याने त्याचा अर्ज छाननीतच बाद झाला होता. आता रिंगणात 23 उमेदवार शिल्लक आहेत. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे व भाजपचे डॉ. रणजीत पाटील यांच्यात एकास एक लढतीचे चित्र असून वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकार, भाजपचे बंडखोर शरद झामरे, काँग्रेसचे बंडखोर श्याम प्रजापती यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. अमरावतीमध्ये प्रहारच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. पण इतर चार जागांबाबत काय, हे प्रहार आणि मेस्टाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
आता बेरीज वजाबाकीच्या राजकारणास सुरुवात
अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने निवडणुकीचे रिंगण स्पष्ट झाले असले तरी खऱ्या अर्थाने बेरीज वजाबाकीच्या राजकारणास सुरुवात होणार आहे. रिंगणातील काही उमेदवार पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नांनाही गती येणार आहे. येत्या 30 जानेवारीस अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील 262 मतदानकेंद्रांत मतदान होणार आहे. मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाऊन येथे करण्यात येणार आहे.
यांनी घेतली माघार...
गोपाल वानखडे, मधुकर काठोळे, डॉ. प्रफुल्ल राऊत, राजेश दांदडे, अॅड. सिद्धार्थ गायकवाड, राजेश गावंडे, किरण चौधरी (प्रहार-मेस्टा), पांडुरंग ठाकरे, नामदेव मेटांगे व मीनल ठाकरे यांनी आज माघार घेतली आहे. मतदार नोंदणीच्या अखेरच्या मुदतीनंतर अमरावती विभागात दोन लाख सहा हजार 172 मतदारांची नोंद झाली आहे. यापूर्वी पाच जानेवारीपर्यंत 1 लाख 85 हजार 925 मतदार होते. अंतिम नोंदणीनंतर त्यामध्ये 19,247 मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये अमरावती 64,344, अकोला 50606, बुलढाणा 37,894, वाशीम 18050 व यवतमाळ येथे 35,278 मतदार आहेत.
ही बातमी देखील वाचा...