Amravati News : नाक आणि तोंड दाबल्याने वसतिगृहातील 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, गृहपालावर गुन्हा
Amravati Student Death : विद्याभारती वसतिगृहात 21 जुलै रोजी 13 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मुलाचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये नाक आणि तोंड दाबल्याने मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
Amravati Student Death : नाक आणि तोंड दाबल्याने अमरावतीमधील वसतिगृहातील 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मुलाचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे. कॅम्प परिसरात असलेल्या विद्याभारती माध्यमिक विद्यालय परिसरात असणाऱ्या मागासवर्गीय वसतिगृहात 13 वर्षीय विद्यार्थ्याचा 21 जुलै रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी रात्री वसतिगृहाच्या गृहपालावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून अद्याप त्याला अटक केलेली नाही.
विद्यार्थ्यांमध्ये 20 जुलै रोजी भांडण झाल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. मृत्यूची अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला कसा याचा बारकाईने शोध घेत आहोत. तसंच विद्याभारती वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु त्यातील काही सुरु असून अनेक निकामी आहेत, त्याचाही कसून तपास सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तसंच याप्रकरणी जिल्हा परिषदेने विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि वसतिगृह प्रमुखांना नोटीस पाठवली असल्याची माहिती समोर आली आहे. ही संस्था माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी उभारली आहे.
काय आहे प्रकरण?
विद्याभारती वसतिगृहात 21 जुलै रोजी 13 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. विद्याभराती विद्यालयाच्या इमारतीत असणाऱ्या वसतिगृहात 90 विद्यार्थी शिक्षण घेऊन तेथील निवासस्थानात राहतात. बुधवारी (20 जुलै) रात्री सर्व विद्यार्थी आपापल्या खोल्यांमध्ये झोपले होते. गुरुवारी सकाळी शाळेतील कर्मचारी विद्यार्थ्यांना उठवण्यासाठी गेला. त्यावेळी सातव्या वर्गात शिकणारा हा विद्यार्थी झोपेतून उठत नसल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेल असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर काल (22 जुलै) अकोला इथे या विद्यार्थ्याचा इन कॅमेरा शवविच्छेदन केलं.
'पापा मुझे मारा', विद्यार्थ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज
विशेष म्हणजे या विद्यार्थ्यानेने बुधवारीच आपल्या वडिलांना कॉल केला होता. वसतिगृहातील विद्यार्थी आपल्याला मारतात. आपण येथे राहणार नाही असे तो म्हणाला होता. एक मेसेज पण केला होता. 'पापा मुझे मारा' हा त्याचा शेवटचा मेसेज होता, असं त्याच्या कुटुंबांनी सांगितलं. त्यानंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबांनी व्यवस्थापनावर आरोप करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.