अमरावतीतील अडीच हजार कोटींचा प्रकल्प रद्द, स्थानिकांमुळे कंपनीने मुक्काम हलवला?
अमरावती परिसरातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या, विशेषत: फार्मा क्षेत्राशी निगडित तरुणांच्या येथे रोजगारासाठीच्या आशा वाढल्या होत्या. आतापर्यंत कंपनीने अनेक कामे सुरू केली होती
अमरावती : महाराष्ट्रातील अनेक मोठे औद्योगिक प्रकल्प एकापाठोपाठ एक सोडून जात आहेत. पश्चिम विदर्भातील ( Vidharbha) ही एक मोठी कंपनी प्रस्तावित प्रकल्प गुंडाळण्याच्या तयारीत आहे. अमरावती (Amravati) नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये (MIDC) हरमन फिनोकेम लि. ने मोठ्या थाटामाटात सुरुवात केली होती. मात्र आता या कंपनीने आपला मुक्काम दुसरीकडे हलवलाय.
हरमन कंपनी नांदगावपेठेत औषध कारखाना काढणार होती. कंपनीला एमआयडीसीमध्ये डी-9 भूखंड देण्यात आला होता. कंपनीने तीन महिन्यांपूर्वी बांधकाम ही सुरू केले होते. कंपाउंड वॉलच्या बांधकामासह काही मशिनरीही आणण्यात आली. हा प्रकल्प 118 एकर जमिनीवर साकारला जाणार होता. यातून निश्चितच शेकडो कोटींची (2500 कोटी) गुंतवणूक होणार होती आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार होती. अमरावती परिसरातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या, विशेषत: फार्मा क्षेत्राशी निगडित तरुणांच्या येथे रोजगारासाठीच्या आशा वाढल्या होत्या. आतापर्यंत कंपनीने अनेक कामे सुरू केली होती. मात्र अमरावतीतील कामकाज अचानक बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याचे सांगण्यात आले.
शेतकरी आणि कंपनीची बाचाबाची
औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीने जमीन दिल्यानंतरही अनेक वर्षे काहीही न झाल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी त्यावर शेती सुरूच ठेवली. जेव्हा काम सुरू झाले तेव्हा कंपनीच्या लोकांनी यावर आक्षेप घेतल्यास शेतकरी आणि कंपनीची बाचाबाची झाली. माहुली जहांगीर पोलीस ठाण्यात अशाच वादाची तक्रार ही दाखल झाली. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात काही दिवस काम सुरू होते तरीही हरमन कंपनी अमरावतीतून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात खळबळ
अमरावतीतून एवढा मोठा प्रकल्प निघून गेल्याने सर्वच औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेषत: कंपनी सोडून जाण्याच्या कारणांची चर्चा होत आहे. स्थानिक समस्यांमुळे अमरावतीतून मोठी गुंतवणूक निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी शेतकरी आणि इतर काही लोक कंपनीच्या अधिकाऱ्यांना सतत त्रास देत असल्याचे समोर आले आहे. तर राजकीय नेत्यांनी सुद्धा कंपनीला पुन्हा काम सुरू करण्यासंदर्भात बोलणी केली पण कंपनी काम करण्यास उत्सुक दिसत नाहीये अशी माहिती आहे.
हे ही वाचा :
MLA Disqualification Case : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी आणखी लांबणार? मुदत वाढवून देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय