तब्बल 32 वर्षानंतर तो घरी परतला, कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी; पत्नीनं औक्षण करत केलं स्वागत
Amaravati: अमरावतीत तब्बल 32 वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला एक व्यक्ती घरी परतला आहे. घरी परतलेल्या पतीला अचानक आपल्या डोळ्यासमोर पाहून पत्नीसह नातेवाईकांना गहिवरून आले आहे.
Amaravati: अमरावतीत तब्बल 32 वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला एक व्यक्ती घरी परतला आहे. घरी परतलेल्या पतीला अचानक आपल्या डोळ्यासमोर पाहून पत्नीसह नातेवाईकांना गहिवरून आले आहे. इतक्या वर्षांनी पतीला समोर पाहून पत्नीला विश्वास बसत नव्हता. त्यांनी पतीला टिळा लावून औक्षण केले. त्यावेळी तेथे हजर असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. केरळच्या एर्नाकुलम येथील दिव्य करूणा ट्रस्टच्या स्वंयसेवकांनी तब्बल 18 वर्ष या व्यक्तीची सेवाशुश्रूषा करून त्यांना घरी परत आणले. 32 वर्षा नंतर पती-पत्नीच्या भेटीचा हा प्रसंग अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात असलेल्या नेकनामपूर गावातील नागरिकांनी अनुभवला. जाणून घेऊया हे नेमकं प्रकरण काय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिक शेषराव काळे यांचा तीन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. मधुकर, रमेश, पुंडलिक हे तीन भाऊ तर कमल नावाची एक बहिण आहे. पुंडलिक यांचे 1984 साली निर्मला यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर त्यांना वैशाली आणि दीपाली या दोन मुली झाल्या. मात्र मुलींच्या जन्मानंतर काही दिवसांतच पुंडलिक यांना मानसिक आजाराने ग्रासले व त्यातच ते कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेले. बरीच वर्षे शोधाशोध करूनही त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. दरम्यानच्या काळात पत्नी निर्मला या आपल्या दोन मुलींसह माहेरी निघून गेल्या. पुंडलिक पुन्हा घरी परत येतील ही आशा देखील घरच्यांनी सोडून दिली होती. मुली लग्नाला आल्यानंतर निर्मला या परत आपल्या घरी आल्या आणि मुलींचे लग्न पार पाडून आपले जीवन जगू लागल्या. इतक्या वर्षांनी आपला नवरा परत येईल याची साधी कल्पनाही त्यांनी कधी केली नाही. मात्र हे घडलं, नियतीला काही तरी वेगळंच मान्य होतं.
पुंडलिक शेषराव काळे हे वय 60 वर्षांचे गृहस्थ जवळपास 32 वर्षा पुर्वी मेंदुवर परिणाम झाल्याने कोणाला काहीही न सांगता घर सोडुन निघून गेले. त्यावेळी नातेवाईकांनी त्यांचा भरपुर शोध घेतला पोलीसांना देखील माहिती दिली. मात्र त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने घरच्यांनी त्यांची परत येण्याची आशा सोडली होती. तर दुसरीकडे पुंडलिक काळे हे भटकत भटकत थेट केरळ या राज्यात पोहचले. तेथे कोणी देईल ते खाऊन व जागा मिळेल तिथे झोपून ते आपले आयुष्य जगत होते. सुमारे 18 वर्षा पूर्वी केरळच्या एर्नाकुलम येथील दिव्य करूणा ट्रस्टच्या स्वंयसेवकांची नजर त्यांच्यावर पडली, त्यांनी पुंडलिक यांना आपल्या आश्रमात नेहून त्यांच्यावर तब्बल 18 वर्ष उपचार केले. मागिल महिन्यात पुंडलिक यांना पुर्वी घडलेला पुर्ण घटनाक्रम आठवला व त्यांनी त्यांचे नाव आणि पत्ता तेथिल स्वंयसेवकांना सांगितला. सदर ट्रस्टने 15 दिवसांपुर्वी चांदुर रेल्वे येथील ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून सदर ईसमाची ओळख पटविणे बाबत आणि पत्या बाबत खात्री पटविणे बाबत कळविले. ठाणेदार कुलकर्णी यांनी नाव आणि पत्ता बाबत खात्री करून केरळ मधील ट्रस्टला माहिती दिली. त्या वरून ट्रस्टचे स्वंयसेवक टोनी पालीकर, बिंदु, बिना कांजुर हे एर्नाकुलम केरळ ते चांदुर रेल्वे पर्यंत सतत संपर्कात राहून बुधवारी सकाळी पुंडलिक काळे यांना घेऊन चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनला पोहचले. याबाबत नेकनापूर नेकनामपूर येथील पुंडलिंक यांचे नातेवाईकांना माहिती देण्यात आली. पुंडलिक काळे यांना घेऊन पोलीसांचा ताफा गावात पोहचला, त्यावेळी संपूर्ण गाव पुंडलिक काळे आणि पोलिसांच्या स्वागतासाठी सज्ज होता.