Ravan Pooja : महाराष्ट्रातील या गावात 350 वर्षांपासून होतेय रावणाची पूजा, आता मंदिरही उभं राहणार
Ravan Puja in Maharashtra : देशात रावणाच्या पुतळ्याचे दसऱ्याच्या दिवशी दहन केले जाते. मात्र, अकोल्यातील या गावात रावणाची पूजा केली जाते.
अकोला : रावण!... रामायणातील 'व्हिलन', खलपुरूष अशीच या पात्राची आपल्या मनात प्रतिमा. सीतेचं अपहरण करणाऱ्या रावणाभोवतीच (Ravan Pooja) रामायणाचं (Ramayan) मध्यांतर आणि क्लायमॅक्सही फिरतो. वाईट शक्तींचं प्रतिक असलेल्या याच रावणाचं दसऱ्याला दहन केलं जातंय. मात्र, अकोला (Akola District) जिल्ह्यातील एका गावात चक्क याच रावणाची पूजा केली जातेय. आता या गावात रावणाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आमदार अमोल मिटकरींनी पुढाकार घेतलाय. हे रावणपुजक गाव कोणतं आहेत?... साडेतीनशे वर्षांची या गावाची रावणमुर्ती पुजेची परंपरा नेमके आहेय तरी काय?
या गावात रावणाची ही मनोभावे पूजा आणि आरती होते. हे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. हे दृष्य रावणाची पुजा करणाऱ्या कोणत्या दाक्षिणात्य राज्यातलं नाहीये. ही पूजा आपल्या महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातील एका गावात होते. हे गाव आहे अकोल्यापासून 50 किलोमीटरवर असलेलं पातूर तालूक्यातील सांगोळा. या गावाच्या अगदी सुरूवातीलाच एका मंदिरवजा चौथऱ्यावर रावणाची एक अतिशय सुंदर, रेखीव मूर्ती आहे. सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या या मूर्तीच्या गावातील आगमनाची एक गोष्ट आहे.
या गावात रावणाच्या मंदिरासोबत इतर देवतांची मंदिरंही आहेत. या देवतांच्या आराधनेबरोबरच गावकरी भक्तीभावानं रावणाचीही आराधना करतात. रावणाच्या मूर्तीचं कुतूहल असल्यानं अनेक लोक या मूर्तीच्या दर्शनालाही येतात. दसऱ्याच्या दिवशी संपुर्ण सांगोळा गाव रावणाच्या आराधनेत रंगून जातंय.
वर्षभरातून दसरा आणि रामनवमीला या रावणासाठी गावकरी विशेष आरती आणि सोहळा साजरा करतात. एकदा काही बाहेरच्या लोकांकडून ही मूर्ती चोरून नेण्याचा प्रयत्न ती उचललीच न गेल्याने फसल्याचं गावकरी सांगतात. दसऱ्याला होणारं रावण दहन थांबवावं, असं आवाहनही हे गावकरी लोकांना करतात.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी सांगोळा गावाला भेट देत रावण मंदिराच्या उभारणीसाठी पुढाकार घेतलाय. त्यांनी आपल्या आमदार निधीतून सांगोळ्यातील या मंदिराला सभागृह बांधकामासाठी 20 लाखांचा निधी दिला आहे. या कामाचं त्यांनी नुकतंच भूमिपूजन केलंय. राज्यात रावणदहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी आमदार अमोल मिटकरींनी सरकारकडे केलीये
रावणात दुर्गुणासोबतच फार मोठे सद्गुणही होतेय. मात्र, आजही या सद्गुणांकडे दुर्लक्ष करीत देशभर होळी होतेय ते ती दुर्गुणरुपी रावणाचीच. सध्याच्या परिस्थितीत महागाई, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार, राष्ट्रीय एकात्मतेचे मारेकरी हेच आपल्यादृष्टीने खरे राक्षस आहेत. त्यांच्या रूपातील रावणाचं दहन करण्याची शपथ यादसऱ्याला घेत आपला देश बलशाली करूयात. सर्वार्थाने हेच खरं आपलं सीमोल्लंघन होऊ शकेल.