NCP : दिवाळीपूर्वी शरद पवार गटातले अजून चार आमदार अजित पवारांसोबत येणार, अमोल मिटकरींचा दावा
Amol Mitkari : नगर जिल्ह्यातील शरद पवार गटातला एक आमदार अजित पवार गटात येण्यास इच्छुक असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे.
अकोला: दिवाळीपूर्वी शरद पवार गटाची साथ सोडून आणखी चार आमदार अजित पवारांसोबत (Ajit Pawar) येणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला आहे. तसेच लोकसभा आणि राज्यसभेचा आणखी प्रत्येकी एक-एक खासदारही अजित पवारांना साथ देईल असंही ते म्हणाले. त्यामुळे शरद पवारांना (Sharad Pawar) सोडण्याची शक्यता असलेले ते चार आमदार आणि दोन खासदार कोण याची चर्चा रंगली आहे.
निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रात नमूद केलेल्या 42 आमदारांव्यतिरिक्त आणखी दोन आमदार अजित पवार गटासोबत असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणाले. तसेच दिवाळीपूर्वी त्यात आणखी चार आमदारांची भर पडून एकूण आमदारांची संख्या ही 44 इतकी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचसोबत लोकसभेतील एक खासदार आणि राज्यसभेतील एक खासदार लवकरच अजित पवारांसोबत येणार असल्याचं ते म्हणाले.
मीरा बोरवणकर यांचा बोलवता धनी कोण हे सांगणार
मीरा बोरवणकरांनी (Meera Borwankar) केलेल्या दाव्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी या प्रकरणी अजित पवारांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यालाही अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, रोहित पवारांना आपल्या काकांनी कशी आणि किती मदत केली याचं भान ठेवावं. अजितदादांची भेट घेतल्यावर मीरा बोरवणकरांचा बोलविता धनी कोण याची माहिती माध्यमांना देणार. त्या आधी अजित पवारांवर आरोप करणाऱ्या मीरा बोरवणकर यांच्या मागे शरद पवार गटातील नेता असल्याचा आरोप मिटकरींनी केला होता.
मिटकरींचा रोख प्राजक्त तनपुरेंवर?
नगर जिल्ह्यातील शरद पवार गटातला एक आमदार अजित पवार गटात येण्यास इच्छुक असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणाले. त्यामुळे त्यांचा रोख प्राजक्त तनपुरेंवर असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी अनेक नवे चेहरे अजितदादांसोबत दिसतील असंही मिटकरी म्हणाले.
शरद पवारांकडे निर्देश?
मीरा बोरवणकरांनी त्यांच्या पुस्तकातून केलेल्या दाव्यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, अजितदादांची भेट घेतल्यावर त्यांनी परवानगी दिल्यास बोरवणकरांचा बोलविता धनी कोण याची माहिती माध्यमांना देणार. शहिद बलवासोबत विमानात कोण बसलं होतं असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
ही बातमी वाचा: