Amol Mitkari : 'भाजपच्या भ्रमाचा भोपळा अकोल्यात फुटणार'; अमोल मिटकरींच्या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी?
Amol Mitkari : भाजपचे अनुप धोत्रे आणि रणधीर सावरकर यांनी निमंत्रण दिले नाही. भाजपचा अकोल्यातील व्यवहार हा हेकेखोरपणाचा असल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरींनी केला आहे.
Amol Mitkari : राज्यात सध्या अनेक ठिकाणी महायुतीतील (Mahayuti) कुरबुरी वाढल्याचे चित्र आहे. त्यातच आता अकोल्यातही महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे (Anup Dhotre) आणि आमदार रणधीर सावरकर (Randhir Savarkar) यांनी कुठलाही संपर्क आणि निमंत्रण दिले नाही. भाजपचा (BJP) अकोल्यातील व्यवहार हा हेकेखोरपणाचा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केला आहे.
त्यांचं सन्मानपूर्वक बोलवणं आल्याशिवाय अकोल्यात भाजपचा प्रचार करणार नसल्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे. तसेच बारामतीत अजितदादांना त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे पडसाद कल्याण आणि ठाण्यात उमटतील, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
अनुप धोत्रे आणि रणधीर सावरकरांवर मिटकरींची टीका
अकोल्यात स्थानिक भाजप पक्ष लोकसभेच्या प्रचारात आपल्याला दूर ठेवत आहे. उमेदवाराचं बोलायचं काम आहे. त्यांना माझं गांभीर्य वाटत नसेल तर मी माझा आत्मसन्मान कसा सोडणार? भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी कुठलाही संपर्क आणि निमंत्रण दिलं नाहीय. तुम्ही अद्याप उभे राहिले नाहीय. एवढे हवेत राहिले तर लोक तुम्हाला कसे निवडून देतील. तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता आमचाच विजय म्हणत असाल तर कुणी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलं नाही हे लक्षात ठेवावे.
भाजपच्या भ्रमाचा भोपळा अकोल्यात लवकरच फुटेल
त्यांना भ्रम आहे की, आपण म्हणजे अंतिम, लोकशाहीत जनता अंतिम असते हे लक्षात ठेवावं. त्यांनी आपला हेकेखोरपणा सोडावा, सर्वांना विश्वासात घ्यावं. अजितदादा आणि तटकरेंच्या कानावर हा विषय घातलाय. आपणच म्हणजे सर्वकाही हा भाजपच्या भ्रमाचा भोपळा अकोल्यात लवकरच फुटेल, असे त्यांनी म्हटले आहे.
विजय शिवतारेंचा स्क्रिप्ट रायटर कोण ?
विजय शिवतारे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सतत टीका करत आहेत. याबाबत अमोल मिटकरी म्हणाले की, टीका, कुरघोड्या सुरूच राहणार आहेत. हेच मविआमध्येसुद्धा आहे. शिवतारेंची एवढं बोलण्याची ताकद नाही, ते पाच वर्ष बोलले नाहीत. अजितदादांच्या मागे-पुढे फिरणारी व्यक्ती आज एवढ्या ताकदीने कसं बोलत आहे. याचा 'स्क्रिप्ट रायटर' शोधला पाहिजे. याच्या मागे पाणी कुठे तरी मुरतंय, असे त्यांनी म्हटले.
...तर आम्हाला ठाण्याचा विचार करावाच लागेल
आमच्या बोलण्याचा रोख स्पष्ट केला तर महास्फोट होईल, त्यामूळे रोख थांबून ठेवा. जेव्हा याचा थांगपत्ता लागेल तेव्हा चित्र क्लियर होईल. शिवतारे त्यांचे बोलणे थांबवणार असतील तर आम्हाला ठाण्याचा विचार करावाच लागेल, त्यासाठी आम्ही कंबर कसली आहे. तुम्ही इकडे हालचाल केली तर आम्ही तिकडे करू. 'ईट का जवाब ईट से देंगे', असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
आणखी वाचा