वेदर स्टेशन नाल्यात बसवलं, यंत्रच पाण्याखाली बुडल्यानं 2000हुन अधिक शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीत बसेना; अकोल्यात गोंधळ
तांत्रिक बिघाडासह चुकीच्या जागेमुळे यंत्र पावसाचे अचूक मोजमाप करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. परिणामी, प्रत्यक्ष पिकांचे नुकसान असूनही शासनाच्या नोंदीत ते कमी दाखवले गेले.

Akola Skymate:अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भरपाई मिळावी यासाठी सरकारकडे आढावा घेतला जातो. मात्र, हवामान केंद्राचा चुकीचा अहवाल आल्याने अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील तब्बल दोन हजारांवर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. उमरा महसूल मंडळात स्कायमेट कंपनीने बसवलेले वेदर स्टेशन चुकीच्या ठिकाणी असल्याने पावसाची योग्य नोंद घेण्यात अपयश आले आणि त्यामुळे नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित राहिले आहेत. यावर skymate कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (Akola News)
नेमकं घडलं काय?
गेल्या दोन वर्षांपासून या भागात स्कायमेट वेदर स्टेशन कार्यरत आहे. मात्र हे यंत्र सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्याच्या पात्रात बसवण्यात आले. त्यामुळे 17 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसावेळी यंत्रावर थेट पाणी वाहत होते. परिणामी, पावसाचे योग्य मोजमाप होऊ शकले नाही. हवामान खात्याला मिळालेला चुकीचा अहवाल वरच्या स्तरावर पोहोचल्याने येथे झालेल्या अतिवृष्टीची योग्य नोंद झालीच नाही. या चुकीमुळे उमरा मंडळातील सुमारे 800 शेतकऱ्यांचे थेट नुकसान झाले असून एकूण 2000 पेक्षा जास्त शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत हा गंभीर प्रश्न तातडीने सोडवावा आणि प्रत्यक्ष झालेले नुकसान लक्षात घेऊन भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
नाल्यात यंत्र बसवलं, पावसाने यंत्रावरूनच गेलं पाणी
याबाबत शेतकरी दिगंबर ठाकरे यांनी सांगितले, “येत्या 17 तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे खूप जास्त नुकसान झालंय. पर्जन्य मापक यंत्राच्या वरून पाणी गेला आहे. अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार जर पर्जन्य मापकाच्या वरून पाणी गेले तर पाऊस मोजू शकत नाही. त्यामुळे आमचं मोठं नुकसान झालं असून आम्ही अतिवृष्टीच्या नियमांमध्ये बसत नाही. हे यंत्र नाल्यामध्ये लावले आहे. चुकीच्या ठिकाणी यंत्र बसवला आहे. दर महिन्याला skymate चा माणूस मेन्टेनन्स करून जातो. पण त्याच्या एकदाही हि गोस्ट लक्षात आलेली नसल्यामुळं वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत कोणतीही माहिती पोहोचलं नाहीय. या गेलेलं पाणी जेंव्हा खाली येतं तेंव्हा येणार अहवाल पुढे जातो. त्यामुळे 17 तारखेला झालेल्या अतिवष्टीमधे आम्ही बसत नाही असं गावकऱ्यांनी सांगितलं.”दरम्यान, हवामान यंत्र चुकीच्या ठिकाणी लावल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. तांत्रिक बिघाडासह चुकीच्या जागेमुळे यंत्र पावसाचे अचूक मोजमाप करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. परिणामी, प्रत्यक्ष पिकांचे नुकसान असूनही शासनाच्या नोंदीत ते कमी दाखवले गेले.
























