Akola: शेगावातून निघालेली गजानन महाराजांची पालखी आज अकोल्यात; अकोलेकरांकडून पालखीचं जंगी स्वागत, तरुणांचा मोठा सहभाग
Akola: संत गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम दोन दिवस अकोल्यात असणार आहे.
Gajanan Maharaj Palkhi Sohala: गजानन महाराजांच्या पालखीचं आज सकाळीच अकोला शहरात आगमन झालं आहे. त्यानिमित्त सारं अकोला शहर 'गण गण गणात बोते'च्या गजरात न्हावून निघालं आहे. गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनानिमित्त अकोल्यात दोन दिवस अक्षरश: दिवाळीसारखं वातावरण निर्माण झालं आहे. गजानन महाराजांची पालखी दोन दिवस अकोल्यात मुक्काम करणार आहे. गजानन महाराज पालखीचं अकोल्यातील हे 54 वं वर्ष आहे.
सकाळी डाबकी रोडमार्गे श्रींच्या पालखीचं अकोल्यात आगमन झालं आहे. मंगळवारी सकाळी पालखी अकोल्यावरून पुढच्या प्रवासाला निघणार आहे. 26 मे रोजी शेगावातून निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं नागझरी, पारस आणि भौरदमार्गे सकाळी अकोल्यात आगमन झालं आहे. शहरातील डाबकी रोडवर गजानन महाराज स्वागत समितीच्या वतीने महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं. यावर्षी पालखीत 700 हून अधिक वारकऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.
शनिवारी (27 मे) रात्री भौरद गावात मुक्काम केल्यानंतर आज डाबकी रोडमार्गे श्रींच्या पालखीचं अकोल्यात आगमन झालं. अकोलेकरांनी मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं आहे. अकोल्यातील मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम राहील.
अकोल्यातील दुसऱ्या दिवशीचा पालखी मार्ग
सोमवारी सकाळी 6 वाजता सिंगी हॉस्पिटल जवळून, उड्डाण पुलावरुन पुढे जिल्हाधिकारी निवासासमोरून, वनविभाग कार्यालय, धर्मदाय आयुक्त कार्यालय आणि पुढे खंडेलवाल भवन मार्गे गौरक्षण रोड, जुने इन्कम टॅक्स चौक असा श्रींच्या पालखीचा मार्ग असेल.
दुपारी आदर्श कॉलनी शाळा नंबर 16 येथे पालखी विश्रांती घेईल आणि त्या ठिकाणी महाप्रसादाचं वितरण होईल, त्यानंतर संभाजीनगर, श्री गजानन महाराज मंदिर, बोबडे दूध डेअरीमार्गे सिंधी कॅम्प रोड आणि दक्षता नगर कॉम्प्लेक्स समोरून जिल्हा कारागृहामार्गे पालखी पुढे जाईल.
अशोक वाटिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय आणि पुढे जिल्हाधिकारी कार्यालय, लोखंडी पुलावरून जय हिंद चौक, राज राजेश्वर मंदिर असा पालखीचा मार्ग असले. हरिहर पेठ मधील श्री शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद टाऊन स्कूल येथे पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील. त्यानंतर मंगळवारी पालखी वाडेगाव मार्गे पुढच्या प्रवासाला निघेल.
आषाढी वारीसाठी दरवर्षी महाराष्ट्रातून (Maharashtra) 43 पालख्या पंढरपुरात (Pandhapur) दाखल होतात. या पालख्यांमध्ये तुकोबारायांची पालखी, माऊलींची पालखी, गजानन महाराजांची पालखी, सोपानकाकांची पालखी, मुक्ताईंची पालखी या पालख्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरतात.
हेही वाचा: