(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shirdi : निकालाआधी साईदरबारी बड्या नेत्यांची भेट, राणेंच्या लेकाला पंकजाताईंनी सांगितला किस्सा
Lok Sabha Election : बीडच्या निवडणुकीत या आधी कधीही पाहायला मिळालं नव्हतं ते या निवडणुकीत पाहायला मिळालं असल्याचं वक्तव्य भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी केलं.
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि नितेश राणे (Nitesh Rane) कुटुंबीयांची शिर्डीतील देवस्थानाच्या ठिकाणी भेट झाली. त्यावेळी दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांची आस्थेने चौकशी केल्याचं दिसून आलं. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत खासदार सुजय विखे यांच्या आई शालिनी विखे पाटील देखील होत्या. त्यावेळी पंकजा मुंडे आणि नितेश राणेंनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
पंकजा मुंडेंनी सांगितला तो किस्सा
भाजप नेत्या पंकजा मुंडे आज साई दरबारी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या आई सोबत होत्या. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील या देखील पंकजा मुंडे यांच्यासोबत होत्या. त्याचवेळी भाजपचे आमदार नितेश राणे हे माध्यमांशी संवाद साधत होते. पंकजा मुंडेंनी राणे कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. नितेश राणे यांचा मुलगादेखील त्याठिकाणी होता. पंकजा मुंडे यांचा ज्यावेळी अपघात झाला होता आणि त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं त्याचवेळी त्याच रुग्णालयात नितेश राणेंच्या मुलाचा जन्म झाला होता. तो किस्सा पंकजा मुंडे यांनी नितेश राणेंच्या मुलाला सांगितला.
साईंच्या कृपेने निकाल सकारात्मक येईल
माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी या संदेशाचे पालन केलं तर जीवनात अडचणी येत नाहीत. आज मी आई बरोबर या ठिकाणी आले. 2014 नंतर प्रथमच आईच्या आग्रहामुळे देवदर्शन करण्यासाठी बाहेर पडले. गेली सत्तर दिवस प्रचारात गेले. कोणतही काम स्वीकारलं तर शंभर टक्के द्यावंच लागतं. साईंच्या कृपेने निकाल देखील सकारात्मक येईल.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, देश हितासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होतात. देशहिताचे निर्णय घेणारे लोक यात आले पाहिजेत आणि हा विचार जनतेने केला असेल तर नक्कीच त्यांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल. आतापर्यंत जे पाहिले नाही ते या निवडणुकीत पाहायला मिळालं. महायुतीचा मला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. त्याचसोबत नगरमध्ये सुजय विखेंचा विजय होईल.
कांद्याच्या प्रश्नावर मात्र पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलण्यास नकार दिला.
बीडमध्ये यंदा भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांचं आव्हान आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्यासमोर ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचं आव्हान आहे. 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार असून कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ही बातमी वाचा: