Nilesh Lanke : विखे हे कुणाचेच नाहीत हे यावरून सिद्ध, निलेश लंकेंचा विखे कुटुंबीयांना टोला
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil : वडील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या महसूलखात्यावरही सुजय विखेंचा विश्वास नाही असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलं.
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी करणं म्हणजे बालिशपणा असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाजपचे सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांना लगावला. सुजय विखेंच्या वडिलांच्या हातातच महसूल खातं असतानाही त्यांच्या विश्वास नाही का असा सवाल विचारत विखे हे कुणाचेच नसल्याचं सिद्ध होतंय असं निलेश लंके म्हणाले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे. त्यावरून निलेश लंकेंनी विखेंना टोला लगावला.
निलेश लंके म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अहमदनगरचे जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी होते आणि सुजय विखे यांचे वडील महसूलमंत्री होते. त्यामुळे विखेंच्या अखत्यारीतील महसूल विभागाच्या हातात निवडणुकीचा सर्व कारभार होता. तरीदेखील त्यांनी असा आक्षेप घेणं म्हणजे त्यांच्याच पक्षाला घरचा आहेर दिल्याचा प्रकार आहे.
भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि जिल्हा निवडणूक आयोगाला ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीचा अर्ज दिला आहे. ईव्हीएमबाबत पाठराखण करणाऱ्या भाजपच्याच एखाद्या उमेदवारांने ईव्हीएमची पडताळणीची मागणी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्याबाबत लंके यांनी बोलताना म्हटलंय की यावरून विखे हे कोणाचेच नाही हेच सिद्ध होतं.
विखेंची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
लोकसभा निवडणुकीत राज्यात महत्त्वाच्या लढतींपैकी एक ठरलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांच्या जोरदार लढत झाली. अत्यंत चुरशीच्या लढतीत अखेर निलेश लंकेंनी 28 हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर, भाजप महायुतीचे (BJP) पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोकसभेच्या 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सुजय विखेंची याचिका फेटाळली.
विविध मतदान केंद्रांसासाठी 21 लाख भरले
सुजय विखेंनी एका मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये याप्रमाणे एकूण 21 लाख रुपयांचं शुल्क भरलं होतं. यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10,पारनेर 10, नगर 5, शेवगाव-पाथर्डी 5, कर्जत-जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली होती. लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांचा 28,929 मतांनी पराभव झाला आहे.
ही बातमी वाचा: