(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shirdi Airport : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! शिर्डी विमानतळावर उद्यापासून नाईट लँडिंग
Shirdi Airport : शिर्डीत आता साईभक्तांसाठी नाईट लँडिंगचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Shirdi Airport : समृद्धी महामार्ग (samruddhi Highway) आणि वंदे भारत ट्रेनने शिर्डीला (Shirdi) जोडल्यानंतर मोदी सरकारने आता शिर्डीला तिसरी भेट दिली आहे. शिर्डीत आता साईभक्तांसाठी नाईट लँडिंगचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डी दाखल होणाऱ्या लाखो साईभक्तांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे.
लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत रोजच हजारो साईभक्त (Saibaba) दर्शनासाठी येत असतात. साधारण 2017 ला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर शिर्डी विमानतळाला मोठा प्रतिसाद मिळत असून विमान प्रवास करणाऱ्या साईभक्तांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून साईबाबांच्या दर्शनासाठी आता रात्री देखील विमानाने पोहचणे शक्य होणार आहे. शिर्डी विमानतळावर उद्यापासून (8 एप्रिल) नाईट लँडिंग (Night Landing) सुरु होत असून दिल्लीहून इंडिगो कंपनीचे पहिले विमान रात्री आठ वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर उतरणार आहे.
दरम्यान शिर्डीच्या साई मंदिरात पहाटे होणाऱ्या काकड आरतीला साई भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. मात्र, अनेक भाविकांना वेळेवर पोहचताच येत नाही. शिवाय काकड आरतीला पोहोचायचं असल्यावर एक दिवस आधीच शिर्डीत यावं लागतं. मात्र नाईट लँडिंगमुळे आता काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या भक्तांना त्याच पहाटे शिर्डीत पोहोचता येणार आहे. आतापर्यंत हैदराबाद, चैन्नई, दिल्लीसह बंगलोर इथून येणाऱ्या विमानांना मोठा प्रतिसाद मिळत असून नाईट लँडिंग सुविधा सुरु झाल्यावर अनेक नवीन विमान सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. नाईट लँडिंग सुविधेमुळे परिसरातील विकासाला अधिक चालना मिळणार हे मात्र नक्की...
काकड आरतीला पोहोचणार
नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग, त्यानंतर मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू झाली होती. त्यानंतर आता नाईट लँडिंगची सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणार्यांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत. गेल्या काही कालखंडापासून यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा होत होता. नाइट लँडिंगमुळे शिर्डीत पोहोचणं सुलभ होणार असून या परिसराच्या विकासाला सुद्धा गती मिळणार आहे.
भाविकांच्या संख्येत वाढ होणार
दरम्यान नाईट लँडिंगचा परवाना प्राप्त झाल्यामुळे शिर्डी यात्रा तर सुलभ होईलच. शिवाय, या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे. भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करुन, विमानांचे उन्हाळी वेळापत्रक लागू होईल, तेव्हा आता रात्रीचीही विमानसेवा यामुळे आता प्रारंभ होईल, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. सध्या शिर्डीला 13 विमानसेवा असून या निर्णयामुळे भाविकांच्या संख्येत देखील मोठी वाढ होणं अपेक्षित आहे. तसंच, स्थानिक अर्थकारणाला गती मिळणार आहे.