(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिर्डी विमानतळाला नाईट लँडिंगचा परवाना, देवेंद्र फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
Shirdi Airport : शिर्डीला समृद्धी महामार्ग आणि वंदे भारतनंतर ही तिसरी भेट मिळाली आहे.
Shirdi Airport : शिर्डीत दर्शनाला जाणार्या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता शिर्डी विमानतळावर रात्रीही विमानाचं लँडिंग आणि टेकऑफ होणार आहे. आज, गुरुवारी सकाळीच डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची परवानगी मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. याला यश मिळाले आहे. कोल्हापूर विमानतळानंतर आता शिर्डीमध्येही नाईट लँडिंगला परवानगी मिळाली आहे.
शिर्डीसाठी गेल्या दोन महिन्यांतील तिसरी आनंदाची बातमी आहे. नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झाला होता. त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती. त्यानंतर आता नाईट लँडिंगची सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणार्यांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत. गेल्या काही कालखंडापासून यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा होत होता. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे तातडीने हा परवाना देण्याबाबत आग्रह धरला आणि आज सकाळी डीजीसीएकडून हा परवाना प्राप्त झाला. शिर्डी विमानतळ देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 2017 मध्ये सुरु झाले होते.
॥Om Sai Ram॥
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 16, 2023
Hat-trick of Good news for SaiBhakts & for Maharashtra!
After Samruddhi Mahamarg, Vande Bharat Express,now our Shirdi airport gets the ‘Night landing’ licence from DGCA today!
The airlines are expected to start the night flights as early as March/April 2023 onwards. pic.twitter.com/OI6Zl0Pr4i
नाईट लँडिंगचा परवाना प्राप्त झाल्यामुळे शिर्डी यात्रा तर सुलभ होईलच. शिवाय, या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे. भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करुन, विमानांचे उन्हाळी वेळापत्रक लागू होईल, तेव्हा साधारणत: मार्च/एप्रिलपासून आता रात्रीचीही विमानसेवा यामुळे आता प्रारंभ होईल, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. सध्या शिर्डीला 13 विमानसेवा आहेत.
कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग -
कोल्हापूर विमानतळावर प्रत्यक्ष नाईट लँडिंग सुविधेचा वापर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरु झाला होता. कोल्हापूरच्या विमानतळ विकासाच्या प्रकियेतील हा मैलाचा टप्पा आहे. 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग सुविधा कार्यरत विमानतळावर कार्यरत झाली. कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी विस्तारित झाल्याने पूर्ण क्षमतेने प्रवासी असलेले विमानाला कोल्हापूर विमानतळावर लँडिंग, टेक ऑफ करता येणार आहे. तीन एटीआर आणि एक एअरबस थांबवण्याची व्यवस्था झाली. धावपट्टीवरील विमानांना योग्य दिशा दाखवण्यासाठी, धुक्यामध्ये लँडिंग, टेक ऑफसाठी मदत करणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास डीजीसीएकडून परवानगी मिळाली.