Samruddhi Mahamarg : समृद्धीवरील नागपूर-शिर्डी बस सेवा स्थगित, पुरेशी प्रवासी संख्या मिळत नसल्याने सेवा बंद करण्याची एसटी महामंडळावर नामुष्की
Samruddhi Mahamarg समृद्धी महामार्गावरुन धावणारी नागपूर-शिर्डी बस सेवा बंद करा असे पत्र नागपूर विभाग नियंत्रकाने एसटी व्यवस्थापनाला पत्र लिहिले आहे.
Nagpur News : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) सुरु झालेली पहिली बस सेवा स्थगित करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे डिझेलचे पैसे निघतील एवढेही प्रवासी मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समृद्धी महामार्गावरुन धावणाऱ्या नागपूर-शिर्डी बस सेवेला स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा करत डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी अशी समृद्धी महामार्गावरील पहिली एसटी बस सेवा सुरु केली होती. फक्त तेराशे रुपये भाडे असलेल्या या सेवेच्या माध्यमातून आठ तासात शिर्डीला पोहोचता येत असल्याने या बस सेवेला मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, अवघ्या तीन महिन्यातच समृद्धी महामार्गावरील पहिली एसटी बस सेवा बंद करण्याची नामुष्की एसटीवर ओढावली आहे. अपेक्षेप्रमाणे प्रवासी मिळत नसल्यामुळे ही बस सेवा स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.
दर महिन्याला प्रवासी संख्येत घट
एबीपी माझाला मिळालेल्या माहिती प्रमाणे नागपूर ते शिर्डी या बस सेवेला डिसेंबर महिन्यात एकूण आसन क्षमतेच्या तुलनेत 41 टक्के प्रवासी मिळाले होते. मात्र, जानेवारी महिन्यात त्यात कमालीची घट होऊन आसन क्षमतेच्या तुलनेत फक्त 13 टक्के प्रवासी मिळाले. फेब्रुवारी महिन्यात ही संख्या आठ टक्क्यांवर आली. फेब्रुवारी महिन्यात तर अनेक दिवस एकही प्रवासी मिळाला नाही, म्हणून बस सेवा बंद ठेवण्याची पाळी एसटीच्या अधिकाऱ्यांवर आली होती. आता पुढे शालेय परीक्षांचा काळ पाहता प्रवासी संख्या आणखी कमी होईल हे लक्षात घेऊन एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रकांनी एसटी व्यवस्थापनाकडे ही बस सेवा बंद करण्याची परवानगी मागत सध्या बस सेवा स्थगित ठेवली आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणारा समृद्धी महामार्ग एसटीला मात्र आर्थिकदृष्ट्या पावलेला नाही असंच सध्याचं चित्र आहे.
समृद्धीवरील पहिली एसटी बस सेवा बंद
- समृद्धी महामार्गावरुन सुरु झालेली पहिली बस सेवा स्थगित
- समृद्धीवरुन धावणारी नागपूर-शिर्डी बस सेवा बंद करा अशा आशयाचे नागपूर विभाग नियंत्रकाचे एसटी व्यवस्थापनाला पत्र
- उद्घाटनानंतर डिसेंबर महिन्यात 41 टक्के प्रवासी मिळाले होते
- जानेवारीत 13 टक्के तर फेब्रुवारीत अवघे आठ टक्के प्रवासी मिळाले
- फेब्रुवारी महिन्यात अनेक दिवस एकही प्रवासी नसल्याने डिझेलचे पैसेही निघाले नसल्याची माहिती
- राज्याला समृद्धी मिळवून देईल अशी अपेक्षा असलेला समृद्धी एसटीला पावलेला नाही