(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Shrirampur Assembly Constituency : श्रीरामपूरमध्ये महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पेच निर्माण झाला आहे.
अहमदनगर : आपला फोटो प्रचारात वापरू नका अशी तंबी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यानंतर त्याला शिवसेना शिंदे गटाचे श्रीरामपूरचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी उत्तर दिल आहे. आपणच महायुतीचे अधिकृत उमेदवार असून 11 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मतदारसंघात प्रचाराला येत असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना गट या दोघांच्या उमेदवारांनीही या ठिकाणी अर्ज भरला असून आपणच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि भाजपचे राधाकृष्ण विखे यांनी लहू कानडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याची घोषणा केली. इतकंच नव्हे तर शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी माझे फोटो प्रचारात वापरू नये अशी तंबीदेखील दिली. त्यानंतर आता शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनीदेखील मीडिया समोर येत आपणच अधिकृत महायुतीचा उमेदवार असल्याचा दावा केला. एवढंच नव्हे तर येत्या 11 नोव्हेंबरला मुख्यमंत्री स्वतः माझ्या प्रचारासाठी मतदारसंघात सभा घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितल.
काय म्हणाले भाऊसाहेब कांबळे?
शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे म्हणाले की, पालकमंत्री विखे पाटील यांनी फोटो न वापरण्याचे म्हटले इथपर्यंत ठीक आहे. मात्र त्यांनी यापूर्वी माझ्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले आणि सभाही घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मला एबी फॉर्म दिलेला आहे. मी मुंबईला त्यांची भेट घेऊन आलो. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले तुम्हीच महायुतीचे उमेदवार आहात. 11 तारखेला मुख्यमंत्री येऊन माझ्यासाठी सभा घेणार आहेत.
भाऊसाहेब कांबळे पुढे म्हणाले की, महायुतीत कुठलीही फूट पडण्याचं कारणच येत नाही. मी भूमिपुत्र आहे. समोरचे उमेदवार बाहेरून आलेले आहे. बाहेरून आलेला उमेदवार या मतदारसंघावर किती लादायचा हा प्रश्न आहे. भूमिपुत्र म्हणून जनता मला निवडून देईल. लहू कानडेचा माझ्यासमोर काहीच विषय नाही येत नाही. त्यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळण्याच कारणे सांगावे..
शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील दोन पक्षांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पेच निर्माण झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लहू कानडे तर शिंदे शिवसेनेकडून भाऊसाहेब कांबळे यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे लहू कानडे यांच्या श्रीरामपूर शहरातील प्रचारार्थ झालेल्या सभेत महायुतीचे अधिकृत उमेदवार लहू कानडे असल्याच वक्तव्य प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. भाऊसाहेब कांबळे आता बास झालं, प्रचारात माझा फोटो वापरू नका. तुम्ही विश्वासघात केलाय असा इशाराच शिंदे गटाच्या उमेदवाराला देत विखे पाटील यांनी लहू कानडे आमचे अधिकृत उमेदवार असल्याचं वक्तव्य केलं.
ही बातमी वाचा: