Ahmednagar Lok Sabha : लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखेंना शंका? 18 लाख रुपये भरत ईव्हीएम अन् व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी
Sujay Vikhe Patil : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी 40 केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील (Ahmednagar Lok Sabha Constituency) भाजपचे (BJP) पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Dr Sujay Vikhe Patil) यांनी 40 केंद्रांवरील ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपॅटची (VVPAT) पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये याप्रमाणे एकूण 18 लाख 88 हजार रुपयांचे शुल्कदेखील भरले आहे. यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव-पाथर्डी 5, कर्जत- जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.
सुजय विखेंच्या मागणीने राजकीय चर्चांना उधाण
लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांचा 28 हजार 929 मतांनी पराभव झाला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली. दरम्यान सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसांत उमेदवाराने पडताळणी संदर्भात मागणी करायची असल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांनी 10 जून रोजीच निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. मात्र याबाबत सुजय विखेंच्या कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. दरम्यान निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.
निवडणूक आयोगाकडे जाणार प्रस्ताव
जिल्हा निवडणूक विभागाने याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव भारतीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission) जाणार आहे. 45 दिवसांच्या आत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली, तर न्यायालयाच्या परवानगीने पडताळणीचा निर्णय होणार आहे. जर कोणी न्यायालयात गेले नसल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही होणार आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे आशीर्वाद घेणार : निलेश लंके
दरम्यान, अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी विखे कुटुंबियांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्यांनी म्हटलंय की, यापुढे सहमतीचे राजकारण करणार आहे. विखे कुटुंबियांचा आपल्याला अभिमान आहे. मी कुठेही गेलो तरी विखे कुटुंबीय आमच्या नगरचे असल्याचे सांगत असतो. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे आशीर्वाद घेणार असल्याचे निलेश लंके यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
सुजय विखेंचा पराभव का झाला, भाजपच्या निरीक्षक अहमदनगरमध्ये; मेधा कुलकर्णींनी सांगितलं राज'कारण'
Video: अखेर निलेश लंके इंग्रजीत बोललेच; सुजय विखेंना टोला; शरद पवारांसमोरच तुफान फटकेबाजी