सुजय विखेंचा पराभव का झाला, भाजपच्या निरीक्षक अहमदनगरमध्ये; मेधा कुलकर्णींनी सांगितलं राज'कारण'
भाजपाने जो 400 पारचा नारा दिला आणि भाजपाला संविधान बदलण्यासाठीच 400 खासदार हवे आहेत असा नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी झाले.
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत भाजपचा मोठ्या फरकाने पराभव झाल्याचं दिसून आलं. भाजपकडूनही (BJP) या पराभवाचं विश्लेषण केलं जात असून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखत त्याच अनुषंगाने तयारी केली जात आहे. भाजप महायुतीची लढाई महाविकास आघाडीच्या तीन पक्षांविरुद्ध होती, पण चौथा पक्षाही त्यांच्यासोबत होता. तो चौथा पक्ष म्हणजे फेक नेरेटीव्ह, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) भाजपच्या पराभवाची कारणमिमांसा केली होती. आता, भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनीही भाजपच्या पराभावाचं कारण सांगितलं आहे. अहमदनगर (Ahmednagar) लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या पराभवाचे कारण जाणून घेण्यासाठी, त्या अहमदगरमध्ये आल्या होत्या. त्यावेळी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भाजपाने जो 400 पारचा नारा दिला आणि भाजपाला संविधान बदलण्यासाठीच 400 खासदार हवे आहेत असा नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी झाले. त्यामुळं भाजपला काही ठिकाणी अपयश आले असं खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हंटलंय. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात माजी खासदार सुजय विखे यांचा पराभव नक्की कशामुळे झाला याचा आणि इतर कारणांचा आढावा घेण्यासाठी भाजपाने निरीक्षक म्हणून खासदार मेधा कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि आढावा घेतला. दरम्यान, येथील लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विरुद्ध सुजय विखे यांच्यात जोरदार लढत झाली. अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या या लढतीत निलेश लंकेंनी विखे पाटलांचा बुरज पाडला. सुजय विखेंना पराभवाचा सामना करावा लागला.
लंके गज्या मारणेंना का भेटले
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार निलेश लंके यांच्यावरही कुलकर्णी यांनी टीकेची तोफ डागली. निलेश लंके यांनी निवडून आल्यानंतर आपल्याला भाजपच्या स्टेजवर असलेल्या काही लोकांची मदत झाल्याचे म्हटले होते. त्यावरुन, मेधा कुलकर्णी यांनी निशाणा साधत आधी खासदारांनी हे सांगावं की तुम्ही गुंड गजा मारणेला का भेटले, असा सवाल खासदार कुलकर्णी यांनी विचारला.
आरोपीला कठोर शिक्षा होईल - कुलकर्णी
वसई घटनेवर देखील मेधा कुलकर्णी यांनी भाष्य करत ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले, लोकांनी घटना घडत असताना भूमिका घेतली असती तर ही घटना थांबवता आली असती. ही घटना सरकारने गांभीर्याने घेतली असून कालच देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट केलंय. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधिताला कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल, असे निर्देश फडणवीसांनी दिल्याची आठवणही मेधा कुलकर्णी यांनी करुन दिली.
हेही वाचा
अजित पवारांच्या काटेवाडीतून शरद पवारांचा इशारा; मोदींना म्हणाले, बारामतीचा चमत्कार बघितला ना