Ahmednagar Crime News : राहुरीत अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात दोन गटात वाद, परस्पर विरोधी फिर्याद दाखल; गावात शांतता
Ahmednagar Crime News : अल्पवयीन मुलीसोबत सेल्फी काढून व्हायरल करण्याची धमकी देणारा मुलगा आणि त्याच्या अल्पवयीन बहिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरून दोन गटात वाद झाला असून सध्या गावात शांतता आहे.
Ahmednagar News : कोचिंग क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुलींचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तू मला आवडतेस असा मेसेज करणारा मुलगा आणि त्याच्या अल्पवयीन बहिणीविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. या सगळ्या प्रकारानंतर दोन गटात झालेल्या वादात प्रार्थना स्थळाची सुद्धा तोडफोड करण्यात आली. 26 जुलै रोजी मध्यरात्री हा सगळा प्रकार घडला असून आज या गावात शांतता असून याविषयी बोलण्यास कोणीही तयार नाही.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यातील उंबरे गावात ही घटना घडली. या गावातील एक अल्पवयीन मुलगी एका शिक्षिकेकडे क्लासला जात होती. सदर शिक्षकेने ईद आणि इतर सणाच्या दिवशी शीरखुर्मा खाण्यास अनेक मुलींना बोलावलं होतं. शीरखुर्मा खाल्ल्यानंतर सेल्फी घ्यावा लागतो असं सांगत काही मुलांसमवेत सेल्फी काढले. मात्र यातीलच एका मुलाने तुझा सेल्फी व्हायरल करू अशी धमकी या मुलीला दिली. त्यानंतर तू मला आवडतेस असा मेसेज केला. अल्पवयीन मुलीने, तिच्या कुटुंबीयांसह याबाबतची तक्रार राहुरी पोलीस ठाण्यात दिली.
हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर राहुरी तालुक्यातील उंबरे गावात एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर दोन्ही समाजात चर्चा झाली आणि गुन्हा दाखल झाला. मात्र, त्याच दिवशी रात्री एका समाजाने दुसऱ्या समाजाच्या प्रार्थना स्थळाची तोडफोड केली. त्याशिवाय, त्या घरावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. मात्र, त्यांनी मांडलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात अद्याप अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा दाखल नाही. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून मेसेज व्हायरल करण्याची धमकी देत तुम्हाला आवडतेस अशी फिर्याद देण्यात आली आहे. आरोपी मुलाविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या अल्पवयीन बहिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसऱ्या समाजाकडून सुद्धा प्रार्थना स्थळाची तोडफोड आणि धमकी अशी फिर्याद देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नेमकं या मागचं खर कारण काय हे बोलण्यास कोणीही अद्याप समोर येत नाही.
गावात शांतता, पोलिसांचा बंदोबस्त तैनात
याबाबत पोलिसांनी सुद्धा गुप्तता पाळली असून नेमका प्रकार काय हे अद्यापही समोर आलेला नाही. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उंबरे गावात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून गावात शांतता असून याविषयी भाष्य करण्यास कोणीही तयार नाही.