Ahilyanagar News : पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला चावला साप, गवतात बसलेल्या सापावर पाय पडला अन्...; अहिल्यानगरमधील घटना
Ahilyanagar News : पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला सापाने चावल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात घडली आहे.

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड (Jamkhed) तालुक्यातील धनेगाव परिसरात अतिवृष्टीमुळे (Heavy Rains) शेतीचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले असून, महसूल विभागाच्या वतीने शेतांमध्ये जाऊन पंचनाम्याचे काम सुरू आहे. अशाच प्रकारे पंचनामे करत असलेल्या तलाठ्याला सर्पदंश झाल्याची घटना गुरुवारी (दि. 2 ऑक्टोबर) सकाळी घडली. आकाश रामभाऊ काशिकेदार (तलाठी, धनेगाव) असे जखमी तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दसऱ्याच्या सणाचा दिवस असतानाही तलाठी आकाश काशिकेदार यांनी आपली जबाबदारी पार पाडत सकाळी 8 वाजल्यापासून धनेगाव परिसरातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले होते. यावेळी ते शेतकरी सुहास काळे, संदीप काळे व प्रमोद काळे यांच्या शेताकडे नदीच्या काठाने चालत जात असताना, गवतात लपलेल्या सापावर चुकून पाय पडल्याने सर्पदंश झाला.
Ahilyanagar News : सर्पदंशानंतर तातडीने मदतीसाठी धावले शेतकरी
सर्पदंश होताच तलाठी काशिकेदार यांना भोवळ येऊ लागली. त्यांच्या सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ त्यांना उचलले, धीर दिला आणि जवळच्या वस्तीवर नेले. त्यानंतर नदीतून गाडी जाऊ शकत नसल्यामुळे बंधाऱ्यावरून उचलत त्यांना नेण्यात आले. शेवटी शेतकऱ्यांनी शिलादीप हॉस्पिटल, जामखेड येथे दाखल केले.
Ahilyanagar News : प्रशासनाची तातडीने दखल
या मदतीच्या कार्यात सुहास काळे, संदीप काळे, वैभव काळे, अनिल काळे, पवन काळे आणि मनोज काळे यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांची तत्परता आणि मदतीची भावना यामुळेच तलाठ्याला वेळेत उपचार मिळाले. घटनेची माहिती मिळताच विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी शिलादीप हॉस्पिटलमध्ये जाऊन तलाठी काशिकेदार यांची प्रकृतीची विचारपूस केली. सुदैवाने सर्पदंशानंतर तात्काळ उपचार झाल्यामुळे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
Ahilyanagar News : अहिल्यानगरला साडेतीन लाख हेक्टर बाधित
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्व भागात आठवडाभर मुसळधार पाऊस झाला. या पावसाने सोळा दिवसांत तबब्ल 3 लाख 40 हजार 293 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. 1034 गावांतील 4 लाख 85 हजार 166 शेतकऱ्यांना या आपत्तीचा फटका बसल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Snake Video: साप पकडणं अंगलट, जालन्यातील तरुणाचा मृत्यू; 24 वर्षीय प्राणवीनेही रुग्णालयात जीव सोडला























