Ahilyanagar Crime News : आठ दिवसांपासून पत्नी माहेरी, मुलांना संपवण्याची धमकी देत पती थेट विहिरीवर आला अन्...; पती-पत्नीच्या वादाने सुखी संसाराची राखरांगोळी
Ahilyanagar Crime News : राहाता तालुक्यातील कोन्हाळे शिवारात शनिवारी एका पित्याने आपल्या चार लहान मुलांसह विहिरीत उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

Ahilyanagar Crime News : राहाता तालुक्यातील कोन्हाळे शिवारात शनिवारी एका पित्याने आपल्या चार लहान मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादातून आणि तिच्या माहेरी गेलेल्याच्या रागातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये अरुण सुनील काळे (वय ३५, रा. चिखली कोरेगाव, ता. श्रीगोंदा) आणि त्यांची मुले शिवानी (८), प्रेम (७), वीर (६) आणि कबीर (५) यांचा समावेश आहे.
पत्नी माहेरी गेल्याने मनोबल खचले
गेल्या आठवड्याभरापासून अरुण काळे यांच्या पत्नी शीला काळे या माहेरी, येवला येथे राहण्यासाठी गेल्या होत्या. पत्नीला परत घरी आणण्यासाठी अरुणने पत्नीला फोन लावला. पण, तिने अरुणचा नंबर ब्लॉक केला होता. पत्नी परत येत नसल्याने अरुण नैराश्यात होता. तसेच अरुणने आपल्या पत्नीला फोनवरून मुलांना संपवण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.
शाळेतून मुलांना घेऊन निघाला अन्...
यानंतर शनिवारी अरुण काळे आपल्या मुलांच्या बहीरवाडी, मेहेकरी येथील बीरभद्र आश्रमशाळेत गेला आणि "मुलांची कटिंग करायची आहे" असे सांगून त्यांना शाळेतून सोबत घेऊन गेला. त्यानंतर थेट कोन्हाळे बायपासजवळील भाऊसाहेब कोळगे यांच्या शेतातील विहिरीवर पोहोचून मुलांना एकामागून एक विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वतःही दारूचे सेवन करून, हातपाय दोरीने बांधून विहिरीत उडी घेतली.
घटनास्थळी दारूच्या बाटल्या, दुचाकी जप्त
पोलिसांनी घटनास्थळी दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि एमएच-१७-डीएल-१९४४ क्रमांकाची होंडा शाईन दुचाकी जप्त केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत सर्व पाच मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच राहाता पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी भेट दिली. पुढील तपास सुरू असून, कौटुंबिक वादातूनच ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पत्नीने शाळेत फोन केला पण...
दरम्यान, शिल्पा अरुण काळेला पती अरुणने फोन करून नांदायला ये नाहीतर आत्महत्या करण्याची धमकी दिल्यानंतर शिल्पा हिने मुलांच्या शाळेत फोन करून मुलांना पतीसोबत पाठवू नका, असे सांगितले होते. मात्र, त्याआधीच अरुण काळे हा आपल्या मुलांना घेऊन गेला आणि भयानक कृत्य केले.
आणखी वाचा























