Nagpur : दहावीत मनपाचा 99.31 टक्के निकाल : 22 शाळांचा निकाल शंभर टक्के, 92.60 टक्क्यांसह प्रगती मेश्राम प्रथम
मनपातर्फे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला 25 हजार रुपये आणि सुवर्ण पदक, द्वितीय येणाऱ्याला 15 हजार रुपये आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजार रुपये पारितोषित देण्यात येणार आहे.
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे जाहिर करण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात नागपूर महानगरपालिकेच्या शाळांनी मोठी झेप घेतली आहे. मनपाच्या शाळांचा यंदाचा निकाल 99.31 टक्के एवढा आहे. विशेष म्हणजे, नागपूर महानगरपालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांनी शंभर टक्के निकाल नोंदवित मनपा शाळाही मागे नाहीत हे दाखवून दिले आहे.
हिंदी माध्यमाचा निकाल 98.45 टक्के, उर्दू माध्यमाचा निकाल 99.77 टक्के आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल 99.31 टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा शुक्रवारी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपकुमार मीना, राम जोशी आणि शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
जयताळा मराठी माध्यम शाळेची विद्यार्थिनी प्रगती धुरेंद्र मेश्राम हिने मराठी, हिंदी उर्दू आणि इंग्रजी या चारही माध्यमातून आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून 92.60 टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मन पटकाविला आहे. विवेकानंद नगर माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी बरखा सुनील साहू हिने 89.20 टक्के गुण प्राप्त करून हिंदी माध्यमातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. उर्दू माध्यमातून कामगारनगर उर्दू माध्यमिक शाळेची महेक खान कय्युम खान हिने 90.80 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. इंग्रजी माध्यमातून जी.एम. बनातवाला मनपा इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी आफरीन सदफ इरशद 90.60 गुण प्राप्त करून प्रथम आली. दिव्यांग विद्यार्थ्यांमधून बुशरा हबीब खान जी.एम. बनातवाला मनपा इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी प्रथम ठरली आहे.
मराठी माध्यमातून दुर्गानगर माध्यमिक शाळेची सह्याद्री प्रवीण भुसारी 92.40 टक्के घेऊन द्वितीय आणि राममनोहर लोहिया शाळेची धनश्री राजेंद्र भेंडारकर 91 टक्के घेऊन तृतीय राहिली आहे. हिंदी माध्यमातून विवेकानंद नगर शाळेची साधना राजू वर्मा 88 टक्के घेऊन द्वितीय आणि ममता पुरुषोत्तम वर्मा 86.40 टक्के घेऊन तृतीय क्रमांक वर आहे. उर्दू माध्यमातून ताजबाग उर्दू माध्यमिक शाळेची नुजहत परवीन मो. अब्दुल जमील 90.20 टक्के घेऊन द्वितीय आणि गंजीपेठ उर्दू माध्यमिक शाळेची राबिया परवीन अब्दुल कादिर 89.80 टक्के घेऊन तृतीय राहिली आहे. इंग्रजी माध्यमातून जी.एम. बनातवाला शाळेची सना परवीन इरशद 85.04 टक्के घेऊन द्वितीय आणि बुशरा हबीब खान 81.08 टक्के घेऊन तृतीय ठरली आहे.
यंदाच्या निकालाचे वैशिष्टय म्हणजे चारही माध्यमांमध्ये प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणा-या सर्व मुलीच आहेत. मान्यवरांनी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा तुळशी रोप आणि मिठाई देऊन सत्कार केला. याप्रसंगी बोलताना स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोतमारे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मेहनत करून प्राविण्य प्राप्त केले आहे. ही त्यांच्या यशाची पहिली पायरी आहे आणि त्यांना भविष्यात मोठा टप्पा गाठायचा आहे. मनपा आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमाने मनपाच्या सहा शाळांना स्मार्ट शाळा बनविण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षणाधिकारी मिश्रीकोटकर यांनी मनपा शाळांच्या निकालाबद्दल माहिती देताना सांगितले की, मनपा शाळांचा निकाल 99.31 टक्के लागला आहे. मराठी शाळांचा 100 टक्के, हिंदीच्या 6 शाळांचा 100 टक्के, उर्दूच्या 8 शाळांचा निकाल 100 टक्के आणि इंग्रजी शाळाचा निकाल हा सुद्धा 99 टक्के लागला आहे. मनपाच्या सर्व शाळांमधून 1456 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 1446 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 158 विद्यार्थी प्राविण्यप्राप्त असून 901 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 365 द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले.
'या' शाळांचा शंभर टक्के निकाल
22 शाळांचा निकाल 100 टक्के आला असून 90 टक्क्याच्यावर 7 शाळांचा निकाल लागला आहे. मासूम संस्थांच्या सहकार्याने मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात मोठी मदत मिळाली. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सुद्धा शिक्षण देण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. मनपातर्फे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला 25 हजार रुपये आणि सुवर्ण पदक, द्वितीय येणाऱ्याला 15 हजार रुपये आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजार रुपये पारितोषित देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सहा.शिक्षणाधिकारी सुभाष उपासे यांनी केले तर आभार सहा.शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके यांनी मानले.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI