National water Awards : 'पाणीदार' गावांचा सन्मान; राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा, राज्यातील 'या' गावांना मान
National water Awards तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार-2020’ ची घोषणा नुकतीच झाली. यात महाराष्ट्रातील दापोली नगरपंचायत (Dapoli) आणि सुर्डी ग्रामपंचायतीला (Surdi Barshi) पुरस्कार मिळाला आहे.
National water Awards 2020: गाव आणि परिसर पाणीदार व्हावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र या स्वप्नासाठी झटणारी उदाहरणं मात्र कमीच दिसून येतात. पाणीदार गावासाठी झटणाऱ्या आणि तशी कामगिरी करुन दाखवणाऱ्या गावांना केंद्र सरकारकडून सन्मानित करण्यात येतं. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार-2020’ ची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला असून महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार जाहीर झाले आहेत.
जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने विविध राज्ये, संस्था आणि व्यक्तींना 11 श्रेणींमध्ये एकूण 57 पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले . यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 2018 पासून राष्ट्रीय जल पुरस्काराची सुरुवात झाली आहे.
दापोली नगर पंचायत आणि सुर्डी ग्रामपंचायत पुरस्कारांच्या मानकरी
सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्थेच्या श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट तीन संस्थांची निवड करण्यात आली असून यात रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या श्रेणीमध्ये पश्चिम विभागातून निवड करण्यात आलेल्या तीन ग्रामपंचायतींमध्ये सोलापूर जिल्हयाच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी ग्रामपंचयातीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जलव्यवस्थापनात उत्कृष्ट कार्यासाठी देशातून तीन गैर शासकीय संस्थांची निवड करण्यात आली असून या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्थेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सुर्डी गावाला ‘पानी’ फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत देखील प्रथम पारितोषिक मिळालं होतं. अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या हस्ते सरपंचांसह ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सुर्डी गावाला पानी फाउंडेशनकडून 75 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha