(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली, एक एकरात तब्बल 25 टन कांदा पिकवला, नगरच्या पठ्ठ्याची कमाल!
Onion Story : या प्रयोगाची राहुरी कृषी विद्यापीठाने देखील दखल घेतली असून या तंत्रज्ञानाचा फायदा इतर शेतकऱ्यांना होण्यासाठी प्रचार आणि प्रसार सुद्धा आता विद्यापीठाच्या मार्फत केला जाणार आहे.
अहमदनगर : एकीकडे शेतीतील उत्पादन कमी होत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे. पण अशातच अहमदनगर जिल्ह्यातील बाबासाहेब गोरे या शेतकऱ्याने केलेल्या एका यशस्वी प्रयोगातून एका एकरामध्ये तब्बल 25 टन कांद्याचं उत्पादन घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या प्रयोगाची राहुरी कृषी विद्यापीठाने देखील दखल घेतली असून या तंत्रज्ञानाचा फायदा इतर शेतकऱ्यांना होण्यासाठी प्रचार आणि प्रसार सुद्धा आता विद्यापीठाच्या मार्फत केला जाणार आहे.
शेती जर फायद्याची करायची असेल तर शेतीची उत्पादन क्षमता वाढवणे गरजेचे आहे. राज्यातील लाखो शेतकरी कांद्याचे उत्पादन घेत असतात. जर एकरी कांद्याच्या उत्पादनाचा विचार केल्यास सरासरी 12 ते 15 टन कांदा निघतो. मात्र जर नियोजनबद्ध शेती आणी तंत्रज्ञानाची जोड दिली तर उत्पादन दुप्पट वाढू शकते हे सिद्ध झालं आहे. राहाता तालुक्यातील राजुरी गावातील प्रयोगशील शेतकरी बाबसाहेब गोरे यांनी एक एकर शेतीत जवळपास अडीच लाख कांद्याची रोपं लावली त्यात पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून एकरी 25 टन कांद्याचे उत्पादन घेतले आहे. कांदा पीक लावण्या आधी शेत जमिनीची देखभाल सुद्धा गोरे यांनी केली असून राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पी. जी. पाटील यांच्या उपस्थितीत हा शेतीतील कांदा काढण्यात आला आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान आता इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कुलगुरूंनी सांगितलं आहे.
बाबासाहेब गोरे गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. डाळींबासाठी त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना डाळींबरत्न नावाने देखील ओळखलं जातं. वडिलांनी परंपरागत शेती केली मात्र शेती नफ्याची कशी करावी आणि इतर शेतकरी सुद्धा कसे सधन होतील यासाठी काम करत असल्याचं बाबासाहेब गोरे यांनी सांगताना कांदा पीक लागवडीची माहिती देखील दिली. दरम्यान राज्यातील शेतकरी आज आर्थिक संकटात सापडला आहे यातून बाहेर पडण्यासाठी अशा प्रकारे शेतीची उत्पादन क्षमता वाढवणे गरजेचे असून गोरे यांच्या सारखे प्रयोग शेतीत राबविले तर बळीराजाचे उत्पन्न वाढण्यास मदत मिळेल हे मात्र नक्की.
हे ही वाचा-