Munjya Movie Review : पिंपळाला लटकलेल्या चेटूकवाडीच्या 'मुंज्या' ब्रह्मराक्षसाची हॉरर कहाणी! कसा आहे सिनेमा?
Munjya : असं म्हणतात अतृप्त इच्छा आपल्याला परत जन्म घ्यायला लावतात, 'मुंज्या' मुलाला वयाने मोठ्या असलेल्या मुन्नी सोबत लग्न करायचं असतं मात्र... 'मुंज्या'ची हॉरर कहाणी आपल्या नक्की आठवणीत राहणार...
आदित्य सरपोतदार
शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग, सुहास जोशी, अजय पुरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे, सत्यराज
सिनेमागृह
Munjya Movie Review : माझी मुंज लहान असताना अगदी कोवळ्या वयात झाली, तेव्हा आमचे मामा काका लोकं चिडवायचे 'आता तुझं टक्कल करायचं', 'मांडीत बेडूक टाकायचा असतो' वगैरे...
पण त्या वयात असलं काहीतरी असलं सांगितलेलं फारच डेंजर वाटायचं! वास्तविक मुंज म्हणजे हिंदू धर्मातील संस्कारापैकी तेरावा संस्कार हा उपनयन संस्कार म्हणून ओळखला जातो.
यालाच मुंज, व्रतबंध, अथवा मौजीबंधन असंही म्हणलं जातं.
उपनयन या संस्काराचा अर्थ आपल्या मुलास ज्ञानाचे चक्षु प्राप्त करण्यासाठीचा संस्कार होय,
ज्ञानाची कवाडं उघडी करणारा हा व्रतबंध संस्कार, ब्रह्मचर्य आश्रमात मुलांना पदार्पण करण्यास महत्वाचा ठरतो.
जगण्यासाठी एखादं व्रत, किंवा एखादी गोष्ट आपण घेतो किंवा त्या बंधनात राहतो अगदी तसंच काहीसं...
यावर सविस्तर लिहण्यासारखं बरंच आहे असो, विषय 'मुंजा'सिनेमाचा निघालाय म्हणून 'मुंज' नक्की काय असते याबद्दल सर्वप्रथम खुलासा आवश्यक आहे...
असा आहे सिनेमाचा प्लॉट...
तुंबाड, कांतारा, स्त्री सारख्या सिनेमाच्या भयकथा या पिढ्यानपिढ्या ऐकीव अश्या दंतकथेतून जन्म घेतलेल्या जबरदस्त कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतल्याचं आपण पाहतच आहोत...
अश्यातच दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) ने अश्याच दंगकथेतील ब्रह्मराक्षस, अर्थात 'मुंज्या' (Munjya) सिनेमा घेऊन आला आहे.
असं म्हणतात अतृप्त इच्छा आपल्याला परत परत जन्म घ्यायला लावतात, असाच सिनेमातील छोट्या गोट्याला मुलाला वयाने मोठ्या असलेल्या मुन्नी सोबत लग्न करायचं असतं मात्र...
त्याची आई म्हणजेच (श्रुती मराठे) त्याला बदड बदड बदडते आणि त्याची मुंज करते.... आता होतं असं की गोट्या असतो फारच हुशार, मुन्नी सोबत लग्न करण्यासाठी पठ्ठ्या थेट गाठतो 'चेटूकवाडी'
तिथं काला जादू, अघोरी मंत्र तंत्र करून मुन्नी सोबत लग्न करण्याच्या धडपडीत चुकीचे पावलं उचलतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो...
कथानक इथेच थांबत नाही तर, असं सांगितलं गेलं आहे की मुंज झाल्यावर दहा दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास त्याचा अतृप्त भटकता आत्मा हा ब्रह्मराक्षस होऊन पिंपळाच्या झाडावर वास्तव्य करतो....
पिंपळाला लटकलेला मुंज्या चेटूकवाडीतून बाहेर कसा येतो? गोट्याचं म्हणजेच 'मुंज्याचं' मुन्नी सोबत लग्न होतं का? या सर्व प्रश्नांची उत्तरं सिनेमा पाहून मिळतीलच...
जाम भारी दिग्दर्शन...
Munjya हिंदी भाषेत प्रदर्शित केलेला सिनेमा आहे, वास्तविक कथा ब्राह्मणी कोकणातील कुटुंबाची असली तरी पाहणाऱ्या सर्वांना नक्की मॅटर काय आहे हे अगदी सुरुवातीला समजून येईल, लेखन निरेंन भट्ट, योगेश चांदेकर, तुषार आजगावकर यांनी मस्त जमवलं आहे तर दिग्दर्शक आदित्य सरपोतदार ने चार चांद लावले आहेत...
का पहावा मुंजा...
सिनेमा तळकोकणात, वाड्यावस्तीत, आणि पुण्यात चित्रीकरण केलाय, उत्तम सिनेमेटोग्राफी, उत्तम फ्रेमिंग, VFX, कलरटोन, आणि सर्वात महत्वाचं बॅकग्राऊंड स्कोर,
कुठेही स्लो नाही, कुठेही रटाळ, किंवा खेचलेली स्टोरी नाही झट की पट सिनेमा संपतो... कॉमेडी नावाला असून आणि हॉरर जास्त असल्याचं पाहायला मिळतं...
कलाकारांचा अभिनय कसा आहे?
सिनेमा अर्थात मराठी दिग्दर्शकाचा असल्याने, मराठी कलाकार खच्चून भरलेले आहेत, सुहास जोशी, श्रुती मराठे, अजय पुरकर, भाग्यश्री लिमये पासून बरेच सगळे तंतोतंत त्या त्या पात्रात उतरलेले पाहायला मिळाले, सर्वांचे बाप काम पाहायला मिळालं.. सोबतच साऊथ चा सत्यराज, किंवा मग मुंजाची हवस आणि शर्वरी वाघचा प्रेमळ अंदाज सर्वकाही तुफान....
काय आवडलं...
कथा, स्क्रिनप्ले, संगीत, सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, अजय पुरकर यांचा अभिनय, सिनेमातली लोकेशन्स, फ्रेमिंग, अभिनय, नसलेली अश्लीलता...
काय नाही आवडलं...
कॉमेडी, क्लायमॅक्स, गाणी, घाईगडबड, उगाचच घुसवलेली पात्रे, गंडलेलं VFX, शर्वरी आणि अभय वर्माची केमिस्ट्री.
पैसा वसूल की पाश्चाताप...
लोकसभा इलेक्शन्स नंतर भर पावसाळ्यात आता घराबाहेर पडणाऱ्या सिने रसिकांसाठी एक मस्त पर्याय 'मुंज्या'सिनेमा आहे, आवर्जुन पाहावा असा पैसा वसूल सिनेमा आहे... बिनधास्त बघायला जा.... काहीतरी वेगळी स्टोरी आठवणीत राहील.
किती स्टार...
मी या सिनेमाला देतोय तीन स्टार! वेळ घेऊन तुंबाड किंवा कांतारा सारखं दर्जेदार हॉररपट करता आला असता मात्र, एक कॉम्पॅक्ट सिनेमा तयार केला त्यातल्या त्यात बरा आहे....
विनीत वैद्य यांचे अन्य Movie Reviews!
Bhakshak Movie Review : मनुष्यप्राणी की भक्षक; वाचा रिव्ह्यू!
Hanu Man Movie Review : कसा आहे 'हनुमान'?
Three Of Us Movie Review: कसा आहे थ्री ऑफ अस?