Trending : 'मायक्रोसॉफ्टचा बाप भारतीय रेल्वे!' सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्ट ट्रोल, भारतीय रेल्वेचं मात्र भरभरून कौतुक, काय कारण आहे?
Trending: मायक्रोसॉफ्टच्या आऊटेजमुळे संपूर्ण जगाची यंत्रणा हादरली, पण सोशल मीडियावर भारतीय रेल्वेचं कौतुक होतंय. मायक्रोसॉफ्ट बंद झाल्यानंतरही रेल्वेवर कोणताही परिणाम दिसून आला नाही. काय कारण आहे?
Trending : मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) सर्व्हर डाऊन झाल्यानंतर जणू जगच थांबल्याचे दिसून आले. याचा परिणाम विमान कंपन्या, दूरसंचार सेवा, बँका आणि माध्यम संस्थांवर झाला. एअरलाइन्सवरही याचा परिणाम दिसून आला. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनमुळे जिथे अनेक यंत्रणांवर परिणाम दिसून आला, तिथे भारतीय रेल्वेने मात्र आश्चर्यकारक बाब सांगितली, आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. भारतीय रेल्वेने सांगितले की, मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन झाल्याने भारतीय रेल्वेवर (Indian Railway) कोणताही परिणाम झाला नाही, त्यांची रेल्वे तिकीट प्रणाली, कंट्रोल ऑफिस ऑटोमेशन आणि इतर रेल्वे सेवांवर या आउटेजचा कोणताही परिणाम नाही. वेळापत्रकानुसार गाड्या धावत आहेत. मायक्रोसॉफ्टच्या आऊटेजमुळे संपूर्ण जगाची यंत्रणा हादरली असताना सोशल मीडियावर भारतीय रेल्वेचे मात्र भरभरून कौतुक होतंय. तर मायक्रोसॉफ्टच्या आउटेजनंतर, सोशल मीडिया यूजर्स मायक्रोसॉफ्टला ट्रोल करत आहेत. असं काय केलं भारतीय रेल्वेने? कारण जाणून घ्या..
मायक्रोसॉफ्टचा बाप भारतीय रेल्वे..! सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस
मायक्रोसोफ्टचे सर्व्हर डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर मात्र विविध पोस्ट आणि कमेंटचा पाऊस पडला. 'मायक्रोसॉफ्टचा बाप भारतीय रेल्वे!' असं म्हणत मायक्रोसॉफ्ट कंपनीला ट्रोल केलं जातंय. मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन झाल्यानंतर जगभरातील अनेक विमान उड्डाणे आणि इतर सेवांवर परिणाम झाला, परंतु भारतीय रेल्वेच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही. एका ट्विटर यूजरने यावर कमेंट केली, “मायक्रोसॉफ्ट का बाप भारतीय रेल्वे,” तर दुसऱ्याने रेल्वे प्रणालीची प्रशंसा केली, आणि म्हटले की, भारतीय रेल्वे अजूनही प्रवासाचे सर्वोत्तम आणि सर्वात विश्वासार्ह साधन आहे.
मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन, पण भारतीय रेल्वेची यंत्रणा सुरळीत
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय रेल्वेशी संबंधित सर्व सेवा सुरळीत सुरू राहिल्या. यामध्ये तिकीट बुकिंगपासून ते ट्रेन कंट्रोल ऑफिस ऑटोमेशन आणि इतर रेल्वे सेवांचा समावेश आहे, तसेच या सर्व सेवा 1999 मध्ये Y2K समस्यांमुळे CRISIS प्रवासी आरक्षण प्रणालीवर विकसित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट बंद झाल्यानंतरही रेल्वेवर कोणताही परिणाम दिसून आला नाही." सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) ही रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे. CRIS हे सक्षम IT व्यावसायिक आणि अनुभवी रेल्वे कर्मचाऱ्यांचे एक अनोखे संयोजन आहे जे त्यास महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जटिल रेल्वे IT प्रणाली यशस्वीपणे वितरित करण्यास सक्षम करते. स्थापनेपासून, CRIS भारतीय रेल्वेच्या अनेक प्रमुख क्षेत्रांसाठी सॉफ्टवेअर विकसित आणि देखरेख करते.
मायक्रोसॉफ्टसह 'या' सेवाही ठप्प
मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा परिणाम भारत, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांवर झाला. त्यामुळे जगभरातील विमानतळ, बँका, मीडिया आणि दूरसंचार सेवा ठप्प झाली. अमेरिकेची आपत्कालीन सेवा 911 बंद झाली होती. या काळात अनेक देशांनी मॅन्युअली एअर तिकीट बुक करणे सुरू केले होते. या काळात Outlook, OneDrive, OneNote, Xbox ॲप, Microsoft Team, Microsoft 365 Admin Center, Microsoft View आणि Viva Engage यांसारख्या अनेक सेवा विस्कळीत झाल्या.
मायक्रोसॉफ्टने आउटेजचे कारण केले स्पष्ट
मायक्रोसॉफ्टमधील या समस्येबाबत कंपनीने याचे मुख्य कारणही स्पष्ट केले आहे. मायक्रोसॉफ्टने सांगितले की, सर्व्हर डाउनेज गुरुवारपासून (19 जुलै, 2024) सुरू झाले, ज्यामुळे Azure सुविधा वापरणाऱ्या अनेक ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागला. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की Azure च्या बॅकएंड इन्फ्रास्ट्रक्चरमधील कॉन्फिगरेशन बदलामुळे सर्व्हर डाउन झाला असावा. मात्र, परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे.
हेही वाचा>>>
Microsoft outage : जगभरातील 1 हजार विमाने रद्द; बँक, टीव्ही चॅनेल, स्टाॅक मार्केटवरही परिणाम, विमानतळावर बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची वेळ