Pandharpur News: पुरुषोत्तम मासात तब्बल एक कोटी भाविक पंढरपुरात, आजवरच्या इतिहासातील ठरला विक्रमी अधिक महिना
यावर्षीचा अधिक महिना हा पंढरपूरच्या इतिहासातील सर्वात जास्त गर्दीचा महिना ठरला असून जवळपास एक कोटीपेक्षा जास्त भाविक या महिन्यात पंढरपूरमध्ये येऊन गेले आहेत
पंढरपूर : सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरातही (Pandharpur News) भाविकांनी गर्दी केली आहे. वारकरी संप्रदायात हा महिना अधिकच पवित्र मानला जातो.पुरुषोत्तम मासाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना सलग सुट्ट्या आल्याने पंढरपूर भाविकांनी गजबजून गेलंय. दर तीन वर्षांनंतर येणारा अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मास हा वारकरी संप्रदायाची पर्वणीच काळ मानण्यात येतो. मात्र यावर्षीचा अधिक महिना हा पंढरपूरच्या इतिहासातील सर्वात जास्त गर्दीचा महिना ठरला असून जवळपास एक कोटीपेक्षा जास्त भाविक या महिन्यात पंढरपूरमध्ये येऊन गेले आहेत. आज या अधिक मासाचा शेवटचा दिवस असूनही आज देखील देवाच्या दर्शनाची रांग हो गोपाळपूर पत्राशेडपर्यंत पोहचली आहे. अधिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आज शेवटच्या दिवसापर्यंत रोज याच पद्धतीने गोपाळपुराच्या पत्राशेड मध्ये दर्शनाची रांग राहिली आहे.
रोज साडेतीन ते चार लाख भाविक
रोज साधारण साडेतीन ते चार लाख भाविक अधिकाची पर्वणी साधण्यासाठी पंढरपुरात येत होते . यातच जोडून सुट्ट्या आल्या तर ही गर्दी पाच लाखाचा एकदा ओलांडत होती . या महिन्यातील दोन्ही एकादशीला आषाढी एकादशीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली. विठ्ठल मंदिरात रोज जास्तीतजास्त भाविकांना देवाचे दर्शन मिळावे यासाठी दिवसाच्या तुळशी अर्चन पूजा आणि रात्रीच्या पाद्यपूजा माझाच्या दणक्यानंतर बंद करण्यात आल्या होत्या . पंढरपूरला रोज येणार भाविक पहिल्यांदा चंद्रभागेचे पवित्र स्नान करून सोबत आणलेले दिव्याचे वाण अर्पण करून दर्शनासाठी रांगेत लागत असे. मात्र विठ्ठल मंदिरात रोज सरासरी 25 हजार भाविकांना देवाच्या पायावर तर 40 हजार भाविकांना देवाचे मुखदर्शन घेता येत होते. त्यामुळे उरलेले भाविक नामदेव पायरी आणि मंदिर शिखराच्या दर्शनावर समाधान मानत होते .
13 लाख भाविकांनी घेतले देवाचे मुखदर्शन
आजवरच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने कधीच भाविक महिनाभर रोज आलेली नोंद नसून या महिनाभरात एक कोटी पेक्षा जास्त भाविकांनी पंढरपुरात येऊन चंद्रभागेचे पवित्र स्नान केले. यात कित्येक राजकीय नेते , सामाजिक कार्यकर्ते यांनी रोज शेकड्याच्या संख्येने भाविकांना पंढरपूरची वारी घडवत पुण्य मिळवले. या अधिक महिन्यामध्ये जवळपास साडेसात ते आठ लाख भाविकांना देवाच्या पायावर दर्शन घेण्याचे भाग्य लाभले तर 13 लाख भाविकांना देवाचे मुखदर्शन घेता आले . यातील बहुतांश भाविकांनी मात्र नामदेव पायरीचे किंवा विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आपला अधिक मास पूर्ण केला .
व्यापाऱ्यांना लाखोंचा फायदा
या महिनाभरात रोज आषाढी यात्रेसारखी गर्दी राहिल्याने व्यापाऱ्यांना लाखोंचा फायदा झाला असून महिनाभर शहरातील बहुतेक हॉटेल लॉजेस हे ओव्हरपॅक होते. यंदा पावसाने ओढ दिल्याने आषाढी यात्रा कमी भरली होती. त्यामुळे अजूनही पाऊस न झाल्याने अधिक महिन्यात देखील भाविक कमीच येणार अशी अपेक्षा असताना कोटभर भाविकांनी अधिकची पर्वणी साधल्याने पंढरपूरच्या उलाढालीत देखील कित्येकपटीची वाढ झाली आहे .
संबंधित बातम्या :