(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Makar Sankranti 2024 : काय पो चे! भोगीपासून ते किंक्रांतीपर्यंत, मकरसंक्रांतीच्या तिन्ही दिवसाचं महत्त्व काय?
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा सण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवसांचा असतो. या तिन्ही दिवसाला पारंपरिक महत्त्व आहे.
Makar Sankranti 2024 : नवीन वर्षाचा पहिलाच सण अर्थात मकर सक्रांतीचा (Makar Sankranti) सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. 15 जानेवारीला जगभरात मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti 2024) सण साजरा केला जाणार आहे. लहानांपसून ते अगदी थोरा-मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा सण अगदी उत्साहात साजरा करतात. पण, मकर संक्रांतीच्या सणाचं महत्त्व नेमकं काय? तसेच, मकर संक्रांत ही एक नाही तर तीन दिवस साजरी केली जाते हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळेच संक्रांतीच्या या तीन दिवसाचं पारंपरिक महत्त्व नेमकं काय आहे ते समजून घेऊयात.
मकर संक्रांतीचा सण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवसांचा असतो. या तीन्ही दिवसांचं महत्त्व जाणून घेऊयात.
'न खाई भोगी तो सदा रोगी’ जाणून घ्या भोगीचं महत्त्व :
मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने धर्तीवर उदंड पिक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. 'भोगी' शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ उपभोगणे, त्याप्रमाणे या दिवशी कष्टाने कमावलेली भाकर देवाला अर्पण केली जाते आणि अन्नधान्याची भरभराट राहू दे अशी प्रार्थना केली जाते. शेतात आलेल्या नवीन पिकांचा उपभोग घेणे म्हणजे भोगी, त्यामुळे शेतात उगवल्या जाणाऱ्या विविध भाज्यांपासून एक भाजी तिळाचा कूट घालून तयार केली जाते. त्याचबरोबर मुगाच्या डाळीची खिचडी असा बेत या दिवशी केला जातो.
मकर संक्रांत
खरंतर, संक्रांतीचा दुसरा दिवस हा मकर संक्रांतीचा आहे. 'मकर' हा शब्द मकर राशीशी संबंधित आहे, तर 'संक्रांती' याचा अर्थ संक्रमण असा आहे. या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीत संक्रमण होण्याच्या कारणामुळेच याला 'मकर संक्रांत' असं म्हणतात. अनेक ठिकाणी मकर संक्रांतीला खिचडी, उत्तरायण, तीळ संक्रांती असेही म्हणतात. या दिवशी महिला घरी हळदी-कुंकू करतात आणि एकमेकींना वाण देतात. तसेच, या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. नात्यातला गोडवा वाढावा यासाठी या दिवशी एकमेकांना तिळगुळही दिले जातात.
तिळगूळ घ्या, गोड बोला;
आमचा तीळ सांडू नका
आमच्याशी कधी भांडू नका' ! अशा शुभेच्छाही या दिवशी दिल्या जातात.
मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा
नवविवाहित दाम्पत्यासाठी पहिली मकर संक्रांत खूप विशेष मानली जाते. मकर संक्रांतीला नववधूला तसेच जावयालाही काळे कपडे आणि हलव्याचे दागिने भेट दिले जातात. हलव्याचा हार, नारळ, कानातले, बाजूबंध, नथ, बांगड्या अशी आभूषणे तयार केली जातात. बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्तीला बोरन्हाण करतात, त्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करून अंगावर हलव्याचे दागिने, डोक्यावर मुकुट, हातात बासरी, बाजूबंद, कंबरपट्टा लावून कृष्णासारख सजवलं जातं. हलव्याचे दागिने साखरगोळे, तीळ,कॅनव्हास, धागे आणि साखरेच्या पाकात बनवले जातात.
...म्हणून मकर संक्रांतीला वाण देतात
मकर संक्रांत ते रथ सप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभ केला जातो. सूर्याच्या उत्तरायणामध्ये हळदीकुंकू करणे हे लाभदायक असते. हळदी-कुंकूच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या आदिशक्तीची पूजा करतो, त्यांना वाण देतो म्हणजे दुसऱ्या जिवातील देवत्वाला तन, मन, धनाने शरण जातो, त्यामुळे वाण देताना वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू द्याव्यात.
किंक्रांत
संक्रांतीचा शेवटचा दिवस हा किंक्रांतीचा असतो. या दिवशी संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले अशी अख्यायिका आहे. त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :