सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Sinnar Assembly Constituency : सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उदय सांगळे यांच्यात लढत झाली होती.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात (Sinnar Assembly Constituency) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उदय सांगळे (Uday Sangle) यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी उदय सांगळे यांचा पराभव केला. सिन्नर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार उदय सांगळे पराभूत झाल्यानं ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात फलकबाजी करण्यात आली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस बाहेर आली आहे.
सिन्नरच्या वडझिरे गावात खासदारांना गावबंदीचा फलक झळकला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अज्ञातांनी खासदारांना गावबंदीचा फलक लावला आहे. या फलक लागताच याबाबत जोरदार चर्चा सुरू झाल्या. यानंतर वडझिरे ग्रामपंचायतीने तासाभरात गावबंदीचा फलक हटवला. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले होते. तसेच सिन्नर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे खासदार आणि अजित पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार माणिकराव कोकाटे यांचा फोटो असणारा बॅनर झळकल्याने संभ्रम निर्माण झालाय. महाविकास आघाडीत संशयाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर अज्ञातांकडून गावबंदीचा फलक लावण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायतीने एकोपा टिकविण्यासाठी तातडीने फलक हटवून फलक लावणाऱ्या अज्ञातांचा निषेध व्यक्त केला आहे.
सक्षम विरोधी पक्ष म्हणून कार्यरत राहणार : उदय सांगळे
दरम्यान, सोशल मीडियावर खासदार राजाभाऊ वाजे यांच्याविषयी काही चुकीच्या पोस्ट टाकण्यात आल्या. गद्दारांना आमच्या गावात येण्यास बंदी, अशा अर्थाची विधाने करण्यात आली होती. याबाबत उदय सांगळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टशी मी अजिबात सहमत नाही. कार्यकर्त्यांनी यापुढे अशा प्रकारच्या पोस्ट टाकू नयेत, असे आवाहन महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार उदय सांगळे यांनी केले आहे. तसेच, निवडणूक लढताना माझ्या बाजूने ज्या कमतरता राहिल्या. जेथे मी कमी पडलो. त्या कमतरता भरून काढण्यासाठी यापुढे मी दिवसरात्र प्रयत्नशील राहील. विरोधी पक्षाचा, पराभूत उमेदवार म्हणूनही मला माझी भूमिका यापुढे बजावायची आहे. सिन्नरमधल्या विकासाच्या मुद्यावर काम करायचे आहे. गोरगरीब जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. जनहिताची भूमिका घेऊन सक्षम विरोधी पक्ष म्हणून यापुढे मी कार्यरत राहणार आहे. निवडणुकीत कोण माझ्याबरोबर होते आणि कोण नव्हते हा आता माझ्या दृष्टीने भूतकाळ झाला आहे. जे माझ्याबरोबर नव्हते तेसुद्धा यापुढे माझ्याबरोबर कसे येतील अशा सकारात्मक दृष्टिकोनातून सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणे हे खेळाडू वृत्तीचे निदर्शक आहे. त्याच भूमिकेतून यापुढे मी कार्यरत राहणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा