20 महिन्यानंतर विठूरायाच्या पगारी सेवेसाठी मिळाला पूर्णवेळ अधिकारी, राजेंद्र शेळकेंनी स्वीकारला पदभार
Ashadhi wari 2023 : अखेर विठ्ठल मंदिराच्या कार्यकारी अधिकारी पदाचा शोध संपला असून राजेंद्र शेळके या उपजिल्हाधिकाऱ्याने देवाची सेवा करण्यास संमती दाखवल्यावर पदभार देण्यात आला.
Ashadhi wari 2023 : अखेर विठ्ठल मंदिराच्या कार्यकारी अधिकारी पदाचा शोध संपला असून राजेंद्र शेळके या उपजिल्हाधिकाऱ्याने देवाची सेवा करण्यास संमती दाखवल्यावर आज त्यांना मंत्रालयाच्या विधी व न्याय विभागात पदभार देण्यात आला. सोमवारी शेळके हे विठ्ठल मंदिरात येऊन कारभार ताब्यात घेणार असून आषाढीपूर्वी अखेर मंदिराला पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी मिळाल्याने आता भाविकांच्या विकासाचे सर्व प्रकल्प वेगाने मार्गी लागू शकणार आहेत. शेळके यांची जवळपास दीड महिन्यापूर्वी कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांचे कडून कार्यभार न स्वीकारल्याने मंदिराला कोणी अधिकारी मिळणार का असा सवाल भाविक करीत होते. मात्र आज शेळके यांनी मुंबईत पदभार स्वीकारल्याने आता 20 महिन्यापासून रिक्त असलेल्या खुर्चीवर पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी मिळाला आहे.
नांदेड येथील धर्माबाद येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या शेळके यांनी विठ्ठल मंदिरात पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्यास संमती दाखविल्याने शासनाने त्यांची मंदिर समितीवर कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षभरात देशभरातून जवळपास साडेतीन कोटी भाविक येत असले तरी दुर्दैवाने मंदिर समितीचा कार्यकारी अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर येण्यासाठी मात्र गेल्या अनेक महिन्यापासून एकही अधिकारी पुढे यायला तयार नव्हता . विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही विधी व न्याय विभागाकडे असून यासाठी प्रत्येकवेळी महसूल विभागाकडे उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रतिनियिक्तिवर पाठवावे लागते. गेल्या अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त होते, त्यामुळे वारंवार पंढरपूरच्या प्रांताधिकाऱ्याकडे याचा पदभार दिला जात होता. यापूर्वी 9 सप्टेंबर 2021 रोजी तत्कालीन कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांच्या प्रतिनियुक्तीचा दोन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर मंदिर समितीला नियमित कार्यकारी अधिकारी मिळालेलाच नव्हता. आता तब्बल 20 महिन्यानंतर विठुरायाच्या मंदिरात सेवा करण्यासाठी राजेंद्र शेळके सोमवारी रुजू होणार असून येत्या आषाढी यात्रेत त्यांना खूप काही शिकायला मिळेल.
सध्या राज्यातील शिंदे सरकारने विठ्ठल मंदिर विकास प्रकल्प या 73 कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली असून हा महत्वाकांक्षी आराखडा व्यवस्थित राबविण्यासाठी शासनाला याठिकाणी पूर्णवेळ उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी मंदिराचा कार्यकारी अधिकारी म्हणून पाहिजे होता. यातच विठ्ठल मंदिरातील अनेक प्रश्न प्रलंबित असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नेमलेली शिवसेना भाजपच्या समितीची मुदत संपून 2 वर्षे झाली तरी अजून नवीन समिती अस्तित्वात आली नव्हती. मंदिरातील प्रशासन संपूर्णपणे कोलमडून गेल्याने पूर्णवेळ कार्यकारी अधिकाऱ्याची गरज होती. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांची मग्रुरीचे अनेक प्रसंग वारंवार समोर येत होते. यातच गैरप्रकाराचे देखील अनेक आरोप होत असतात मंदिराला पूर्णवेळ अधिकारी नसल्याने भाविकांच्या सुविधा विठ्ठल भरोसे होत्या. गेल्या काही दिवसापासून सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे याना मंदिराचा पदभार दिल्यानंतर त्यांनी मंदिराला चांगलीच शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. आता शेळके याना ठोंबरे यांनी बसवलेली घडी व्यवस्थित पुढे चालू ठेवावी लागणार असून भाविकांच्या सोयींवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मंदिराला शिस्त लावून भाविकांच्या गैरसोयी दूर करणे , भाविकांच्या विकासाच्या योजनांना गती देणे आणि 73 कोटीच्या मंदिर विकास आराखड्याची सुरुवात करणे ही प्रमुख आव्हाने नवीन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासमोर असणार आहेत. यातच आषाढी महासोहळा काही दिवसावर येऊन ठेपल्याने त्यावरही शेळके याना लक्ष द्यावे लागणार आहे .