Palghar : मिनी महाबळेश्वर ओळख असलेल्या पालघरमधील धबधबे ओसंडून वाहू लागले; पर्यटकांचा ओढा वाढला
Palghar : मुंबई लगत असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार हे मिनी महाबळेश्वर समजले जाते.
Palghar Picnic Spot : मुंबई लगत असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार हे मिनी महाबळेश्वर समजले जाते. पावसाळा सुरू झाला की येथील वातावरण रमणीय बनते. जव्हार भागातसुद्धा अशी काही पर्यटन स्थळं आहेत जी पर्यटकाांना भुरळ घालतात. हा अति दुर्गम भाग असला तरीही येथील दाभोसा आणि हिरडपाडा धबधबे मनमोहक आहेत. तालुका अतिदुर्गम असला तरी मात्र, निसर्गाच्या कुशीत वसलेले हे धबधबे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत चालले आहेत.
जव्हार तालुक्याच्या ठिकाणा पासून साधारण 15 ते 20 किमी वर डोंगराच्या खुशीत वसलेले दाभोसा आणि हिरडपाडा हे धबधबे आहेत. धबधब्याची उंची किमान 300 फूट आहे. सध्या पर्यटकांची गर्दी या दाभोसा या गावी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालघर जिल्हयासह मुंबई तसेच गुजरात, नाशिक आणि सिल्वासामधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या धबधब्यावर आनंद लुटण्यास येत आहेत. या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा बाराही महीने सुरु असल्याने पावसाळा नसतानाही पर्यटकांना या पर्यटन स्थळाचा आनंद घेता येतो. मात्र, वर्षाऋतूत धबधब्याच्या बाजूला असलेली हिरवाई दिसत असल्याने या दोन्ही धबधब्याचं सौंदर्य अधिक खुलुन दिसते आणि यामुळे पर्यटक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येथे येताना पाहायला मिळतात.
दाट दिसणारे धुके आणि कोसळणारे धबधबे हे इथलं खास वैशिष्ट्य आहे. जागोजागी हिरवळ दिसत असल्याने बाराही महिने या ठिकाणी प्रसन्न वातावरण दिसते. दाभोसा आणि हिरडपाडा या धबधब्यात जेवढ्या वेगाने आणि उंचीवरून हे पाणी खाली पडतं तितक्याच वेगाने त्याचे तुषार 50-60 फुटांपर्यंत वर उडतात. हे न्याहाळताना बालपणीच्या आठवणींत हरवून जायला होतं. चारही बाजूने डोंगरदऱ्यांनी वेढलेला परिसर, सर्वत्र जंगल आणि नीरव शांतता तसेच धबधब्यातून पडणा-या पाण्याचा खळखळाट हे दृष्य खुप मनोहारी आणि विलोभनीय असल्याने पर्यटकांकडून वेगळंच समाधान व्यक्त केलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Mumbai : तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने महानगरपालिका प्रशासनाने केलेली 10 टक्के पाणी कपात रद्द
- Travel : वर्षा पर्यटनासाठी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले ‘बेस्ट डेस्टिनेशन’; नक्की वाचा
- ‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा