Kargil Vijay Din : सर्वात भयंकर, दीर्घकाळ चालणारे युद्ध, जेव्हा भारतीय लष्करानं पाकिस्तानी सैन्याला धूळ चाखली! प्रत्येकाला 'या' शौर्याबद्दल 10 गोष्टी माहित हव्या
Kargil Vijay Din : कारगिल विजय दिवसाबद्दस असे काही प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं प्रत्येक भारतीयाला माहित असणे आवश्यक आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सर्वात कठीण अशा कारगिल युद्धाविषयी 10 खास गोष्टी...
Kargil Vijay Din : भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी...सैनिकहो तुमच्यासाठी.. आज कारगिल विजय दिवस... भारतमातेसाठी ज्या ज्या सैनिकाने आपल्या प्राणांची आहुती दिली, अशा या सैनिकांची यशोगाथा सांगावी तितकी कमीच आहे. हा दिवस भारतीय सैन्याच्या प्रत्येक सैनिकाला समर्पित आहे, ज्यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. आजची ही तारीख म्हणजे भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे आणि आपल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक आहे. आपण कारगिल विजय दिवस का साजरा करतो? 26 जुलैला काय घडले? कारगिल युद्ध काय होते? कसे होते? ऑपरेशन विजय काय होते? असे काही प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे प्रत्येक भारतीयाला माहित असणे आवश्यक आहे. जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानमधील सर्वात कठीण अशा कारगिल युद्धाविषयी 10 खास गोष्टी...
सर्वात भयंकर आणि दीर्घकाळ चालणारे युद्ध
स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्धे झाली आहेत. पहिली 1965 मध्ये, दुसरी 1971 मध्ये आणि तिसरी 1999 मध्ये. पण सर्वात भयंकर आणि दीर्घकाळ चालणारे युद्ध म्हणजे 1999 मध्ये झालेले कारगिल युद्ध. भारताने पाकिस्तानविरुद्धची तिन्ही युद्धे जिंकली आहेत. परंतु कारगिल युद्धातील भारताच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी, भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, तसेच त्यांच्या शौर्याला आदरांजली वाहण्यासाठी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
कारगिल युद्धाचे Code Name काय होते?
1999 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, भारतीय लष्कराने कारगिल सेक्टरमधून पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावण्यासाठी केलेल्या कारवाईला 'ऑपरेशन विजय' असे नाव देण्यात आले. या कारगिल युद्धात, भारतीय सैन्य तीन तुकड्यांमध्ये विभागले गेले. त्यांना अभिमन्यू, भीम आणि अर्जुन अशी नावे देण्यात आली.
26 जुलैला कारगिल विजय दिवस का साजरा केला जातो?
26 जुलै 1999 ही तारीख भारतासाठी खूप खास आहे. टायगर हिल, पॉईंट 4875, पॉइंट 5140 यासह सर्व डोंगर शिखरे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यापासून मुक्त करून भारतीय लष्कराच्या शूर सैनिकांनी कारगिल युद्ध जिंकले होते. ही तारीख भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे आणि आपल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक आहे.
कारगिलचा खरा हिरो कोणाला म्हणतात?
प्रत्येक सैनिकाची भूमिका महत्त्वाची असली तरी काहींच्या धाडसाच्या गाथा इतिहासाच्या पानात कायमच्या नोंदल्या गेल्या. त्यापैकी एक म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा, ज्यांना कारगिल युद्धाचे नायक म्हटले जाते. 9 सप्टेंबर 1974 रोजी जन्मलेले कॅप्टन विक्रम बत्रा 7 जुलै 1999 रोजी या युद्धात शहीद झाले. त्यांच्या धैर्यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र, भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पाकिस्तानशी समोरासमोरच्या लढाईत कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 5 शत्रूंना ठार केले. स्वतःला गंभीर दुखापत होऊनही विक्रम बत्रा पुढे आले आणि त्यांनी आपल्या माणसांचे नेतृत्व केले. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसताना त्याने जोरदार गोळीबार करत समोरून शत्रूंवर हल्ला केला. अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवताना ते स्वतः शहीद झाले.
कारगिल युद्ध का सुरू झाले?
काश्मिरी दहशतवादी असल्याचं भासवत पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषा (LOC) ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यावर युद्धाला सुरुवात झाली. LOC ही काश्मीर प्रदेशात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वास्तविक सीमा म्हणून काम करते. पाकिस्तानी लष्कराने व्यूहरचना करून महत्त्वाची जागा काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. कारगिल हे लडाख अंतर्गत येते. मात्र, युद्ध झाले तेव्हा लडाखसह हा संपूर्ण परिसर जम्मू-काश्मीरच्या अंतर्गत आला. सध्याचा बहुतेक कारगिलचा भाग एकेकाळी पुरीग म्हणून ओळखला जात होता.
कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते?
कारगिल युद्ध झाले, तेव्हा भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते. युद्ध जिंकल्यानंतर त्यांनी 'ऑपरेशन विजय' यशस्वी झाल्याचे घोषित केले. भारत सरकारने पाकिस्तानशी चर्चेसाठी अटी ठेवल्या आहेत, असेही सांगण्यात आले. या युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ होते.
कारगिल युद्धात भारताला कोणत्या देशाने मदत केली?
कारगिल युद्धात इस्रायलने भारताला मदत केल्याचे सांगण्यात येते. इस्रायलने भारतीय लष्कराला ड्रोनसह इतर लष्करी साहित्य आणि उपकरणे पुरवून मदत केली होती.
कारगिल युद्ध किती दिवस चालले?
नॅशनल वॉर मेमोरियलने दिलेल्या माहितीनुसार, कारगिल युद्ध सुमारे 3 महिने चालले. मे 1999 मध्ये कारगिल युद्धाला सुरुवात झाली. या काळात 674 भारतीय जवानांनी देशासाठी बलिदान दिले. कारगिल शहीदांपैकी 4 जणांना परमवीर चक्र, 10 जणांना महावीर चक्र आणि 70 जणांना त्यांच्या शौर्याबद्दल वीरचक्र प्रदान करण्यात आले.
कारगिल युद्ध कोणी जिंकले?
1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्ध भारताने जिंकले होते. नियंत्रण रेषा (LOC) ओलांडून भारतात घुसलेल्या पाकिस्तानने हल्ला सुरू केला. पण, आपल्या भारतीय सेनेने साहस दाखवून पाकिस्तानचा पराभव केला.