बनावट औषधांचा सुळसुळाट; FDA म्हणतं काळजी घ्या, पण बनावट औषधे ओळखायची कशी?
औषधे खरेदी करताना नागरिकांना सावधानता बाळगावी, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) केलंय. राज्यातून तसेच परराज्यातूनही बनावट औषधं विक्रीसाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी बनावट औषधांच्या विक्रीचा सुळसुळाट सुरू झालाय. त्यामुळे औषधे खरेदी करताना नागरिकांना सावधानता बाळगावी, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) केलंय. राज्यातून तसेच परराज्यातूनही बनावट औषधं विक्रीसाठी येत असल्याची माहिती समोर आल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं (Food and Drug Administration) म्हटलंय. नागरिकांनी औषधांची खरेदी करताना सावधानता बाळगावी असे जरी प्रशासनाने म्हटले असले तरी नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यावी? याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने काहीही सांगितले नाही. कोणते औषध खरे आणि कोणते औषध खोटे ते कसे ओळखावे याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती प्रशासनाने दिलेली नाही. त्यामुळे औषध खरेदी करताना नागरिकांची होणारी फसवणूक नेमकी थांबणार कशी? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
औषधांची खरेदी करताना सावधानता बाळगावी एवढ सांगून, अन्न आणि औषध प्रशासन विभाग आपली जबाबदारी झटकत आहे. बनावट औषधांची विक्री रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस पावले प्रशासन उचलताना दिसत नाही. नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ प्रशासन केव्हा रोखणार? हा खरा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचबरोबर ही औषधांची विक्री नेमकी का होतेय? ती होऊच नये यासाठी प्रशासन काय पावले उचलत आहे, हा देखील चिंतनाचा विषय आहे.
बनावट औषधांच्या विक्रीच्या मुद्याबाबत एबीपी माझाने जे जे रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेवत कानिंदे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितले. बनावट औषधांच्या बाबतीत नागरिकांना खरच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी तीन चार गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
सावधगिरी कशी बाळगाल?
१) नागरिकांनी स्वत: च्या मनाने कोणतीही औषधे खरेदी करु नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.
२) मेडीकलमध्ये दर्शनी भागावर शासनाने परवानगी दिलेली कागदपत्रे लावलेली असतात. ती कागदपत्रे आहेत की नाही याची खातरजमा रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी करावी, त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही
३) जी औषधे खरेदी करता, त्याच्या मागील बाजूवर औषधे कधी तयार झाली, आणि त्या औषधांवर एक्सपायरी तारीख लिहलेली असते, ती पाहावी. तसेच रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असतो, तो देखील रुग्णांनी पाहावा.
४) महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक शहरांमध्ये खुली औषधांची विक्री केली जाते. अशा खुल्या ठिकाणी विक्री होणाऱ्या औषधांची रुग्णांनी अजिबात खरेदी करु नये अशी माहिती यावेळी डॉक्टर कानिंदे यांनी दिली.
बऱ्याच वेळा डॉक्टरांनी रुग्णांना दिलेली औषधे समजत नाही. कारण डॉक्टरांची हँड राईटींग रुग्णांना समजत नाहीत. मागे सोशल मिडीयावर डॉक्टरांच्या बऱ्याच प्रीसक्रिप्शन व्हायरल देखील झाल्या आहेत. याबाबत रुग्णांनी औषधे घेताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे असा डॉक्टर कानिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल, सरकारचा आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडून वेळोवेळी डॉक्टरांना सांगितले आहे की, रुग्णांना समजेल अशा भाषेत डॉक्टरांनी औषधे लिहून द्यावीत. त्यावर डॉक्टरांचे नाव, त्यांचे शिक्षण आणि रुग्णांना समजेल अशी भाषा हवी. मात्र, प्रत्येकचं वेळी डॉक्टरांनी लिहलेली भाषा रुग्णांना समजेल असे नाही. ती मेडीकल टर्मिनॉलॉजी असते. बरेच डॉक्टर सध्या कॉम्प्युटरवर टाईप करुन रुग्णांना औषधे देतात. ती पद्धत जर सगळ्याच डॉक्टरांनी अवलंबली तर काही अडचण येणार नसल्याचे कानिंदे यावेळी म्हणाले.
रुग्णांनी सुद्धा औषधे खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे. त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. रुग्णांनी देखील डॉक्टरांनी दिलेली औषधेच घ्यावीत. भ्रष्टाचार करण्यासाठीच अशा बनावट औषधांची विक्री केली जाते. पण अशी बनावट औषधांची विक्री करु नये, हा खूप मोठा गुन्हा आहे. कारण, यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी माहिती डॉक्टर कानिंदे यांनी दिली.
दरम्यान, जरी प्रशासनाने औषधांची खरेदी करताना नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असले तरी, काळजी कशी घ्यावी याबाबत काहीही सांगितले नाही. त्यामुळे बनावट औषधांच्या विक्रीचा सुळसुळात थांबणार कसा? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सर्वांनी अन्न आणि प्रशासन विभागाला याबाबत जाब विचारणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित जागांची निवडणूक 18 जानेवारीला, तर 19 जानेवारीला मतमोजणी
- Be Positive : अमरावतीतील उपचारासोबतच रुग्णांना मोफत औषधे, गावागावात जाऊन डॉक्टरांची रुग्णसेवा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )