(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pregnancy and Diabetes : गर्भावती महिलांसाठी मधुमेह अधिक धोकादायक, मातांनी घ्यावी 'या' गोष्टींची काळजी
Diabetes Effect On Pregnancy : रक्तातील अनियंत्रित साखर गर्भवती महिलेच्या प्रसूतीमध्येच अडथळा निर्माण शकते. इतकंच नाही तर आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोकादायक निर्माण होऊ शकते.
World Diabetes Day 2022 : सध्याच्या धकाधकीच्या, व्यस्त आणि वाईट जीवनशैलीमुळे ( Lifestyle ) अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. यामध्ये मधुमेह ( Diabetes ) आणि उच्च रक्तदाब ( Blood Pressure ) या आजारांचाही समावेश आहे. या आजारांचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. शरीरातील असंतुलित साखरेच्या प्रमाणामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. मधुमेह आजार गर्भवती महिलांसाठी अधिक धोकादायक ठरु शकतो. आज 'जागतिक मधुमेह दिन 2022' (World Diabetes Day 2022) आहे. मधुमेह आजाराचा वाढता धोका लक्षात घेता नोव्हेंबर महिना हा मधुमेह जनजागृती महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे.
गर्भवस्थेदरम्यान मधुमेह आजार अधिक धोकादायक
गर्भवस्थेदरम्यान मधुमेह आजार अधिक धोकादायक ठरु शकतो. रक्तातील अनियंत्रित साखर गर्भवती महिलेच्या प्रसूतीमध्येच अडथळा निर्माण शकते. इतकंच नाही तर आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकते. म्हणूनच गर्भावस्थेदरम्यान मातांनी रक्तातील साखरेच्या पातळी नियंत्रित ठेवत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. गर्भवती महिलांमध्ये या आजारामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात आणि काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घ्या.
अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात
टाईप-1 आणि टाईप-2 मधुमेहाव्यतिरिक्त गर्भावस्थेतील मधुमेह देखील गंभीर आजार आहे. गरोदरपणातील मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचं असंतुलन. गर्भधारणेमुळे शरीरात हार्मोनल बदल होतात. यामुळे गर्भधारणेदरम्यान रक्तातील साखर अनियंत्रित होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवणं फार गरजेचं आहे. हे सोपे नसतं. रक्तातील साखरेच्या असंतुलनामुळे गर्भवती महिला आणि बाळासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
गर्भावस्थेत मधुमेह होणे किंवा आधीपासूनच मधुमेह असणे या दोन्ही परिस्थितीत आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी धोका निर्माण होतो. याचा परिणाम म्हणजे बाळाला जन्मत: आजारांचा धोका, प्रसूती दरम्यान बाळाच्या जीवाला धोका, प्रसूती प्रक्रियेमध्ये अडथळा येणे, गर्भपात होणे किंवा वेळेआधी बाळ जन्माला येणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गर्भवती महिलेच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात असणे भ्रूण आणि गर्भवती महिला दोघांसाठीही फार आवश्यक आहे. त्यामुळेच डॉक्टर गर्भवती महिलेची तिसऱ्या महिन्यापासूनच मधुमेह चाचणी करण्यास सुरुवात करतात.
अशी घ्या काळजी
- गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर मधुमेहाची बहुतेक प्रकरणांमध्ये नियंत्रित केल्याने गर्भवती महिलेच्या आरोग्याचा धोका कमी होण्यास मदत होते.
- गर्भवती महिलेला आधीच मधुमेह असल्यास, गर्भधारणेबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमचा मधुमेह पूर्णपणं नियंत्रणात असेल तेव्हाच बाळासाठीचा निर्णय घ्या.
- तुम्हाला गर्भावस्थेतील मधुमेह टाळायचा असेल, तर गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच तुमचे वजन, आहार आणि शारीरिक हालचालींबाबत जागरूक राहा.
- तुमचं वजन जास्त असल्यास, गर्भधारणेच्या दिशेने हालचाल सुरु करण्यापूर्वी वजन नियंत्रित करा.
- प्री-डायबिटीज असलेल्या महिलांनी योग्य प्रमाणात औषधोपचार करणे, साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे आणि आहार आणि जीवनशैलीत छोटे बदल करणे आवश्यक आहे.
- गर्भवती महिलांनी नियमितपणे चाचणी करणे आवश्यक आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )