Bengaluru Crime: बंगळुरुच्या के आर मार्केटमध्ये धक्कादायक घटना, बसची वाट पाहणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक
K R market Bengaluru: बंगळुरुच्या के आर मार्केट परिसरात एका महिलेवर टोळक्याकडून सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांना अटक.
बंगळुरु: बंगळुरुच्या के आर मार्केट परिसरात बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार (Rape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. पीडित महिला रात्रीच्या वेळी के आर मार्केट (K R Market) येथे बसची वाट पाहत होती. त्यावेळी काही नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. बंगळुरु पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. (Bengaluru Crime)
पोलिसांकडून देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास के आर मार्केटमधील गोडाऊन स्ट्रीटजवळ ही घटना घडली. पीडित महिला ही मूळची तामिळनाडूची आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. त्यानंतर तिने घर सोडले होते. ही महिला रविवारी बसची वाट बघत उभी होती. यावेळी तिने बाजूला उभ्या असणाऱ्या काही व्यक्तींना येलहांकाला जाणारी बस कधी येणार, असे विचारले. तेव्हा तेथील लोकांनी तिला बसस्टॉप दुसऱ्या जागी असल्याचे सांगितले. या लोकांनी महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने गोडाऊन स्ट्रीट परिसरात नेले. यानंतर या नराधमांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केले. तसेच महिलेकडील मोबाईल, दागिने आणि पैसे चोरले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत दोघांना ताब्यात घेतले आहे. बंगळुरुचे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी संबंधित महिलेला निवारा गृहात पाठवण्यात आले असून याप्रकरणाचा तपास सुरु असल्याचे सांगितले. पोलिसांनी अद्याप याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या नराधमांची नावं जाहीर केलेली नाहीत. मात्र, हे सर्वजण के आर मार्केटमध्ये मजूरी करत होते, अशी माहिती आहे.
बंगळुरुतील राजकीय वातावरण तापले
या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले की, भाजपच्या राजवटीत बंगळुरुत कधी बलात्कार झालेच नाहीत का? बलात्कार होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. पीडित महिलेला पूर्ण संरक्षण दिले जाईल. या सगळ्यात काही समाजकंटकांचा हात आहे. आम्ही त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करु, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले.
मात्र, भाजपच्या बी.वाय. येडुरिप्पा यांनी याप्रकरणावरुन सरकार जोरदार टीका केली आहे. काँग्रेस सरकार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखू शकत नाही. कर्नाटक राज्य एकेकाळी संस्कृती, परंपरा आणि सुरक्षित राज्य म्हणून ओळखले जात होते. यापूर्वी कर्नाटकची प्रतिमा कधीच अशी मलीन आणि वाईट झाली नव्हती. के आर मार्केटमध्ये महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराची घटना अमानवी आहे. राज्यात पोलीस यंत्रणा आणि गृह मंत्रालया या यंत्रणा अस्तित्त्वात आहेत का?, अशी टीका भाजप नेत्यांकडून करण्यात आली.
आणखी वाचा