Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Jaykumar Gore: सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात, असं म्हणत सोलापुरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अप्रत्यक्षपण मोहिते पाटील यांना गर्भित इशारा दिला आहे.
पंढरपूर: सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री (Solapur Guardian minister) आणि भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी भाजपच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना त्रास होईल असं कृत्य खपवून घेतलं जाणार नसल्याचा इशारा विरोधकांना दिला आहे. सगळ्यांकडे सगळ्याची औषधे असतात, तुम्ही बाकीच्या गोष्टींना एवढे महत्व देऊ नये. भाजप पक्ष किंवा कार्यकर्त्याला त्रास होणारे कुठलेही कृत्य चालू देणार नाही, अशा स्पष्ट शब्दात सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी मोहिते पाटील यांना इशारा दिला आहे. तुम्ही त्यांना इतके का महत्त्व देता हेच मला कळत नाही, योग्य वेळ आल्यावर जयकुमार गोरे (Jaykumar Gore) याला मुख्यमंत्र्यांनी इथे का पाठवले हे दिसून येईल, असा टोलाही गोरे यांनी यावेळी बोलताना लगावला आहे. टेंभुर्णी येथे सुमन मल्टिप्लेक्सच्या उद्घाटनाला आले असता गोरे माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणालेत जयकुमार गोरे?
सोलापूर जिल्ह्यातून कुणाचा राजीनामा घ्यायचा किंवा घ्यायचा नाही. हा पक्षाचा निर्णय असणार आहे. पण सोलापूर जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्याला त्रास देणारे कृत्य चालवून देणार नाही, असा थेट इशारा जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी मोहिते पाटील यांचे नाव न घेता दिला आहे.
जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे पालकमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यात आले होते. आपण 23 जानेवारी रोजी विठ्ठल दर्शनानंतर पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार असून आज केवळ कौटुंबिक कार्यक्रमामुळे इथे आलो असल्याचं जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. माळशिरस तालुक्यातील 22 गावांना अद्याप पर्यंत पाणी मिळाले नाही. त्यामुळे आपण माळशिरस तालुक्यातील 22 गावांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात प्रवेश करताच मोहिते पाटील यांचे होमपीच असणाऱ्या माळशिरस तालुक्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तसेच आव्हाने आपल्याला आवडतात. असेही सांगत गोरे यांनी गरज पडल्यास आपण कठोरपणे काम करू असे संकेतही दिले आहेत.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना शह देण्यासाठी जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची सोलापूरच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याची राजकीय चर्चा आहे. अशातच जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात येताच मोहिते पाटील यांना थेट इशारा दिला आहे . जिल्ह्यात सहा लोकप्रतिनिधी महाविकास आघाडीचे असल्याने जे विकासाबरोबर येतील त्यांना सोबत घेऊन काम करू अशा शब्दात विरोधी आमदारांनाही इशारा दिला आहे .